Sleeper Vande Bharat Train News: देशातील सर्वांत लोकप्रिय, आरामदायी, वेगवान ट्रेन म्हणजे वंदे भारत. अद्यापही या ट्रेनची क्रेझ भारतीय प्रवाशांमध्ये दिसून येते. वंदे भारत ट्रेनचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सुरुवातीला ८ डब्यांसह सुरू झालेली वंदे भारत ट्रेन आता १६ डबे, २० डब्यांसह सेवेत आहे. अनेक मार्गांवरील वंदे भारत ट्रेनचे डबे वाढवले जात आहेत. यातच अनेक दिवसांपासून काहीच चर्चा नसलेल्या वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनबाबत आता काही माहिती समोर येत आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत आहे. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन सेवेत आणण्याची तयारी सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. भारतीय रेल्वे या महिन्यात देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवू शकते, असे सांगितले जाते. आरामदायी, वेगवान आणि नवीन तंत्रज्ञानासह, वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या आहेत. ही नवीन ट्रेन देशातील रेल्वे प्रवास आणखी चांगला करेल.
रेल्वे मंत्र्यांचे सूचक विधान अन् चर्चांना सुरुवात
गुजरातमधील भावनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू केली जाईल. त्यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेन सप्टेंबरमध्ये येत आहे. याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही आणि ती कधी सुरू होईल हे निश्चित झालेले नाही. २५ जुलै २०२५ रोजी राज्यसभेत एका लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते की, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटचा पहिला प्रोटोटाइप आधीच तयार करण्यात आला आहे. स्लीपर वंदे भारत संदर्भात अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सर्व चाचण्यांनंतर ती सुरू करण्यात येणार आहे.
दिल्ली ते पाटणा आणि दरभंगा किंवा सीतामढी
भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग दिल्ली ते पाटणा आणि दरभंगा किंवा सीतामढी दरम्यान असू शकतो. दिवाळी आणि छठपूजेच्या आधी उत्सवाच्या हंगामापूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते, असा कयास आहे. तसेच वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट किती असेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की, जेव्हा रेल्वे बोर्डाकडून ट्रेनचा मार्ग निश्चित केला जाईल, तेव्हा अंतिम तिकिटाची किंमत जाहीर केली जाईल.
स्लीपर वंदे भारतची वैशिष्ट्ये
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे डिझाइन ८० किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी करण्यात आले आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये चार्जिंग सुविधेसह रिडिंग लाइट, डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षा कॅमेरे, मॉड्यूलर पेंट्री आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि शौचालये आहेत. याशिवाय, प्रथम श्रेणीच्या एसी कोचमध्ये गरम पाण्यासह शॉवरची सुविधा आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे डबे प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहेत. यात अनेक खास वैशिष्ट्ये असतील, जी आतापर्यंत कोणत्याही ट्रेनमध्ये नाहीत.