नवी दिल्ली - मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza)  डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital Payment) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे. फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. मात्र आता यामध्ये एक अपडेट आलं आहे.

1 जानेवारी 2021 पासून टोल नाक्यावरील सर्व कॅश लेन डेडिकेटेड फास्टॅग  लेनमध्ये रुपांतरित केल्या जातील. ही सुविधा हळू हळू फास्टॅग लेनमधील सर्व लेनमध्ये रूपांतरित केली जाईल. यामुळे कोणत्याही टोल प्लाझावर रोख पैसे घेतले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे फास्टॅग नसल्यास, आपली कार टोल पार करू शकणार नाही. फास्टॅग न लावणाऱ्या  वाहनचालकांकडून दुप्पट टोल कर वसूल करण्याची सरकारची योजना होती. मात्र एका विशेष सेवेचा वापर करून, फास्टॅग नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचता येतं. 

जर फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा  (Prepaid touch and go card service) वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही प्री-पेड कार्ड्स रोखीच्या व्यवहारास पर्याय ठरणार आहेत. जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स (PoS) कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता आणि फास्टॅग ऐवजी हे कार्ड वापरल्यास टोल दुप्पट होणार नाही.

प्रीपेड कार्ड फास्टॅग असल्यावरही वापरता येतं. FASTag ब्लॅकलिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास टोल कर भरण्यास या कार्डचा वापर करता येईल. प्री-पेड कार्ड खरेदी आणि रिचार्जसाठी प्रत्येक टोल नाक्यावर दोन PoS तयार केले जातील. कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहक ते नेट बँकिंगद्वारे किंवा पीओएस वर रिचार्ज करू शकतात. प्रत्येक टोलनाक्यावर रोखीच्या व्यवहारासाठी सध्या दोन लेन आहेत. मात्र 1 जानेवारीपासून या लेनही बंद ठेवल्या जाणार आहेत.

फास्टॅग कसा काढायचा?

- फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे. 

- या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल. 

- बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे. 

- Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही फास्टॅग काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?

- जर तुम्ही फास्टॅग बँक खात्यासोबत लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही. 

- तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल. 

- फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता.

एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही. दोन गाड्या असल्यास दोन वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: will not pay double toll even without fastag learn new service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.