नितीशकुमार रिस्क घेणार? बिहारमधून नाही तर उत्तर प्रदेशातून लोकसभा लढण्याची शक्यता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:52 IST2023-07-21T16:51:54+5:302023-07-21T16:52:38+5:30
जदयूच्या उत्तर प्रदेश संघटनेने त्यांना युपीतून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. आता बिहार सोडून नितीशकुमार भाजपाचा बालेकिल्ला बनलेला युपी निवडतात का याची चर्चा सुरु झाली आहे.

नितीशकुमार रिस्क घेणार? बिहारमधून नाही तर उत्तर प्रदेशातून लोकसभा लढण्याची शक्यता...
स्वत:चे राज्य बिहार, तिथलेच मुख्यमंत्री तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधणारे नितीशकुमार बिहारमधून नाही तर उत्तर प्रदेशमधून लोकसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. जदयूच्या उत्तर प्रदेश संघटनेने त्यांना युपीतून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. आता बिहार सोडून नितीशकुमार भाजपाचा बालेकिल्ला बनलेला युपी निवडतात का याची चर्चा सुरु झाली आहे.
नितीशकुमारांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविल्यास एक मोठा संदेश देशभरात दिला जाणार आहे. तसेच पक्ष आणि विरोधकांच्या एकजुटीलाही ताकद मिळणार आहे. जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा युपीचे संयोजक सत्येंद पटेल यांनी उचलून धरला होता.
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांनी देखील नितीश कुमार कुठून निवडणूक लढवणार हे आताच सांगणे योग्य नाही. काहींनी बैठकीत यूपीतील फुलपूर किंवा मिर्झापूरमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी आंबेडकर नगरमधून निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे, असे ते म्हणाले.
जेडीयूचे काही अधिकारी नितीशकुमार यांना फुलपूरमधून निवडणूक लढवण्याची मागणी करत आहेत. कारण फुलपूर मतदारसंघाचे जातीय समीकरण पाहता येथे कुर्मी मतदार सर्वाधिक आहेत. त्यानंतर येथे यादव, मुस्लिम आणि ब्राह्मण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. अशा स्थितीत कुर्मी मतदारांच्या मदतीने निवडणूक लढवण्याची रणनीती नितीशकुमार करू शकतात. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.