भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीचा संयुक्त उमेदवार आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरेल.
यासंदर्भात आज दुपारी १२:३० वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाऊ शकते.
या नावांवर विरोधकांची चर्चा - माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, I.N.D.I.A. ब्लॉकचे प्रमुख नेते काही नावांवर चर्चा करत आहेत. यांत चांद्रयान-१ प्रकल्पाचे नेतृत्व करणारे माजी इस्रो शास्त्रज्ञ मैलस्वामी अन्नादुरई यांच्या नावाचाही समावेश आहे. ही निवडणूक लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाची लढाई म्हणून सादर करावी, अशी विरोधकांची इच्छा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, चर्चा होत असलेल्या नावांपैकी एक म्हणजे तामिळनाडूतील द्रमुक खासदार तिरुची सिवा यांचेही आहे. याशिवाय, सुरुवातीच्या चर्चेत महात्मा गांधींचे पणतू इतिहासकार तुषार गांधी यांचे नावही आले होते, जेणेकरून ही निवडणूक भाजपविरुद्धचा वैचारिक संघर्ष म्हणूनही दाखवता येईल.राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट - एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन सोमवारी दिल्लीत पोहोचले. येथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अनेक वरिष्ठ भाजप नेते विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत पोहोचल्यानंतर राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.