विभाष झा -
पाटणा : बिहारमध्ये सध्या बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. कधी ‘डॉग बाबू’ तर कधी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे फोटो लावून रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला जात आहे. मात्र आता तर अतिरेक करण्यात आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावून रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आल्याची बाब समोर येताच प्रशासनाची कोंडी झाली आहे. हा प्रकार बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील आहे.
अर्जदाराचे नाव ‘डोनाल्ड जॉन ट्रम्प’अर्जदाराचे नाव ‘डोनाल्ड जॉन ट्रम्प’, वडिलांचे नाव ‘फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प’ आणि आईचे नाव ‘मेरी अँनी मॅकलिओड’ असे लिहिण्यात आले होते. चौकशीत हा अर्ज बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने तो तात्काळ रद्द करण्यात आला. पोलिसांनी सायबर गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे? समस्तीपूर जिल्ह्यातील मोहद्दीनगर ब्लॉकमधील लोकसेवा केंद्रात एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला.
अर्जासोबत एक फोटो जोडलेला होता, तो फोटो पाहून यात फेरफार करण्यात आल्याचे दिसत होते. तर अर्जात पत्ता गाव मोहद्दीनगर, वाॅर्ड क्रमांक १३, पोस्ट बाकरपूर, जिल्हा समस्तीपूर असे लिहिण्यात आले होते.
प्रशासनाने काय म्हटले?या घटनेची माहिती मिळाल्यावर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) आणि सर्कल ऑफिसर (सीओ) यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, प्राथमिक तपासणीत हा अर्ज पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हा अर्ज रद्द करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी तपास सुरू आहे.