दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:59 IST2025-11-13T16:57:04+5:302025-11-13T16:59:38+5:30
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ जो स्फोट झाला, त्याचा तपास करताना पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान देवेंद्र आणि अमित ही नावे देखील समोर आली आहेत.

दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेतच, पण या प्रकरणाच्या तपासातून एक अतिशय गंभीर मुद्दा समोर आला आहे, जो सेकंड हँड कार विकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी डोळे उघडणारा आहे. पोलिसांनी स्फोटात वापरल्या गेलेल्या आय२० कारच्या मूळ मालकापासून ते कार डीलरपर्यंत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे कार विकल्यानंतरही कायदेशीर जबाबदारी संपत नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्फोटात वापरलेल्या कारचे गूढ; देवेंद्र, अमित पोलिसांच्या रडारवर
लाल किल्ल्याजवळील या स्फोटात आय२० कारमध्ये डॉक्टर उमर नावाचा व्यक्ती होता. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या कारच्या मालकीचे गुंतागुंतीचे जाळे समोर आले. देवेंद्र नावाचा ओखला येथील रहिवासी या आय२० कारचा मूळ मालक होता. त्याने दीड वर्षापूर्वी ही कार खरेदी केली होती आणि ती विकलीही होती.
अमित, जो एक कार डीलर आहे, त्याला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. अमितकडे ही कार कोणामार्फत आली आणि उमर त्याच्या संपर्कात कसा आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आय२० कारचे रजिस्ट्रेशन आणि मालकी हक्काचे हस्तांतरण योग्य प्रकारे झाले आहे की नाही, यावरच तपासाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
तुम्ही कार विकली, पण RC ट्रान्सफर झाली नाही, तर...
या घटनेमुळे एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न उभा राहिला आहे: जर तुम्ही विकलेली जुनी कार नंतर एखाद्या मोठ्या गुन्ह्यात वापरली गेली, तर कायदेशीररित्या तुम्ही अडचणीत येऊ शकता का? याचे थेट उत्तर आहे - होय!
जर तुम्ही कारची विक्री केली, पण तिचे मालकी हक्क परिवहन कार्यालयाच्या नोंदीनुसार नव्या व्यक्तीच्या नावावर वेळेत आणि योग्य पद्धतीने हस्तांतरित केले नसतील, तर तुम्हाला गंभीर कायदेशीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, एवढेच नव्हे तर थेट चौकशीचा सामना करावा लागू शकतो.
कायदा काय म्हणतो?
लाल किल्ला स्फोटासारख्या घटनेत, तपास यंत्रणा सर्वात आधी वाहनाचा मागोवा नोंदणी प्रमाणपत्रामध्ये असलेल्या नावावरून घेतात. म्हणजेच, RTO मध्ये ज्याचे नाव 'नोंदणीकृत कायदेशीर मालक' म्हणून आहे, तो व्यक्ती आपसूकच पोलिसांच्या रडारवर येतो. मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार जोपर्यंत आरटीओच्या नोंदीमध्ये मालकी हस्तांतरित होत नाही, तोपर्यंत विक्रेता हाच कायदेशीर मालक राहतो.
गंभीर गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहितानुसार मालकाचा थेट संबंध सिद्ध झाल्याशिवाय त्याला सहसा दोषी धरले जात नाही. पोलीस सुरुवातीला नोंदणीकृत मालकाची चौकशी करू शकतात आणि त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवू शकतात. अशा वेळी, मूळ मालकाला हे सिद्ध करावे लागते की, अपराध होण्यापूर्वीच वाहन विकले गेले होते. अपराधाबद्दल किंवा गुन्हेगाराच्या उद्देशाबद्दल त्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. अपराधाच्या वेळी वाहन त्याच्या ताब्यात नव्हते.
सेकंड हँड कार विकताना ही प्रक्रिया चुकू देऊ नका!
आय२० स्फोटाच्या घटनेतून हाच बोध मिळतो की, जुने वाहन विकताना केवळ पैशांचा व्यवहार करणे पुरेसे नाही. मालमत्ता हस्तांतरण ही कायदेशीर गरज आहे आणि ती पूर्ण करणे आवश्यक आहे. वेळेत आणि अचूकपणे मालकी हस्तांतरण न केल्यास, मूळ विक्रेत्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे, जर तुम्ही कार विकली असेल, तर 'विक्री' झाल्यानंतर लगेच RTO मध्ये जाऊन मालकी हक्काची ट्रान्सफर पूर्ण झाली आहे की नाही, याची खात्री करा, अन्यथा दुसऱ्याच्या गुन्ह्यामुळे तुम्हाला कायद्याच्या फेऱ्यात अडकावे लागेल.