बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:12 IST2025-11-08T15:10:13+5:302025-11-08T15:12:47+5:30
Rajnath Singh News: भाजपामध्ये कोणतेही मतभेद नाही. आरएसएस कधीही भाजपाच्या राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही.

बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
Rajnath Singh News: बिहार विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. या निवडणुकीनंतर भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो, असे संकेत एका बड्या नेत्याने दिले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. अनेक नेत्यांची नावे या पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाही यात महत्त्वाची ठरू शकते, असेही म्हटले जात आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल असे त्यांनी सांगितले. तसेच पक्षात कोणताही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या पुढील अध्यक्षाबद्दल समजेल. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. आरएसएस कधीही भाजपाच्या राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही. मी लहानपणापासूनच आरएसएसशी संबंधित आहे. आरएसएस देशभक्तीची चेतना निर्माण करते, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
दोन तृतीयांश बहुमत एनडीएला मिळू शकेल
बिहारमध्ये जनतेच्या प्रतिसादामुळे आम्हाला विश्वास आहे की, आम्ही सरकार स्थापन करू. दोन तृतीयांश बहुमत मिळवू. नितीश कुमार मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. प्रशांत किशोर हे एक बिनमहत्त्वाचे घटक आहेत. त्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. लोकांना माहिती आहे की, कोण मते विभागण्यासाठी लढत आहे आणि कोण सरकार स्थापन करण्यासाठी लढत आहे. किशोर यांच्या पक्षाला कदाचित एकही जागा जिंकता येणार नाही, असा मोठा दावा राजनाथ सिंह यांनी केला. एका मुलाखतीत राजनाथ सिंह बोलत होते.
दरम्यान, पुढील अध्यक्ष हे भाजपाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. जेपी नड्डा यांनी पहिल्यांदा २०१९ मध्ये कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि २०२० मध्ये त्यांची अधिकृत निवड झाली. नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या जागी आता नवीन चेहऱ्याचा शोध भाजपाकडून सुरू आहे.