Will be designed like a polling booth for vaccination | लसीकरणासाठी करणार पोलिंग बुथप्रमाणे रचना

लसीकरणासाठी करणार पोलिंग बुथप्रमाणे रचना

एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : कोरोना महासाथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांनी काय उपाययोजना आखल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत लसीकरण मोहिमेवरही चर्चा झाली. त्यात कोरोना प्रतिबंधक लस देशात समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदान केंद्राच्या धर्तीवर सर्वत्र लसीकरण केंद्रांची स्थापना केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीत कोरोना प्रतिबंधक लस नेमकी कधी उपलब्ध होणार, याबाबत ठोस काहीही सांगण्यात आले नसले तरी लसीकरण मोहिमेसंदर्भात निती आयोगाचे सदस्य  आणि कोरोना प्रतिबंध लस कृती दलाचे प्रमुख  डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक सादरीकरण केले. निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे 
मतदान केंद्रांची स्थापना केली जाते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्रे स्थापन केली जातील व या केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शीतकोठारांची साखळी अधिक मजबूत करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. ही शीतकोठारे कोविन ॲपशी संलग्न करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

अशी पाेहाेचेल लस
n पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाईल
n आरोग्य कर्मचारी 
आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात प्राधान्य
n लसीकरण केंद्रांची गटनिहाय स्थापना
n सरकारी आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर लसीकरण मोहिमेची जबाबदारी 
n मोहिमेशी संबंधित लोकांना प्रशिक्षित केले जाईल
n जनसहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल

कोरोनाची सद्य:स्थिती

दिल्ली : दररोज सरासरी १११ बाधितांचा मृत्यू
महाराष्ट्र : दररोज सरासरी ९० बाधितांचा मृत्यू

लस येत नाही तोपर्यंत सर्वत्र कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will be designed like a polling booth for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.