Will arrangements if Rahul Gandhi wants to visit J&K for enjoyment: sanjay raut | ...तर राहुल गांधींच्या पूर्ण दौऱ्याचं नियोजन आम्ही करूः शिवसेना
...तर राहुल गांधींच्या पूर्ण दौऱ्याचं नियोजन आम्ही करूः शिवसेना

नवी दिल्लीः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळावरूनच दिल्लीला पाठवण्यात आले. ते काश्मीरची परिस्थिती पाहण्यासाठी जात असतानाच त्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेनं राहुल गांधींना उपरोधिक टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहुल गांधींना पिकनिकसाठी जायचं असल्यास आम्ही त्यांचं नियोजन करू, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती नाजूक असल्याकारणानं त्यांना तिथे जाण्यापासून मज्जाव केला आहे, तरीही त्यांना पिकनिकसाठी जाण्याची इच्छा असल्यास आम्ही त्याचं पूर्ण नियोजन करू, असा शब्दच राऊतांनी दिला आहे. तसेच कलम 370 रद्द करून कोणाचं स्वप्न पूर्ण झालं आहे हे मी सांगू शकत नाही. पण देश या निर्णयाची वाट पाहत असल्याचं मी नक्कीच सांगू शकतो. त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

तत्पूर्वी काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी दिल्लीत केली होती. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती अतिशय वाईट आहे, असे आम्हाला विमानातील प्रवाशांनीच सांगितले, पण केंद्र सरकार हे देशातील जनतेपासून लपवू पाहत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांची ही गळचेपी असल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी केला. राहुल गांधी यांच्यासह आनंद शर्मा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे टी शिवा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, मनोज झा, माजिद मेमन, शरद यादव हे नेते होते. दुपारी त्यांचे विमान श्रीनगर विमानतळावर अडवून तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना सांगितले.

Web Title: Will arrangements if Rahul Gandhi wants to visit J&K for enjoyment: sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.