विवाहबाह्य संबंध, त्यातून होणारा विश्वासघात आणि गुन्हे ह्या गोष्टी गेल्या काही काळात कमालीच्या सामान्य झाल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमधील कल्लाकुरिची येथे उघडकीस आली आहे. विवाहबाह्य संबंधांमधून इथे थरकाप उडवणारं हत्याकांड घडलं आहे. इथे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करत त्यांची डोकी धडावेगळी केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लाकूडतोड्या म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय कोलंजी याला त्याची पत्नी लक्ष्मी हिच्या चारित्र्यावर बऱ्याच दिवसांपासून संशय होता. तिचे कुठेतरी विवाहबाह्य संबंध सुरू आहेत, अशी त्याला शंका होती. त्यामुळे पत्नीला रंगेहात पकडण्यासाटी त्याने एक डाव आखला. कोलंजी याने आपण मंगळवारी रात्री शहराबाहेर जाणार असल्याचे पत्नीला सांगितले आणि तो घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरा तो गुपचूप घरी परत आला. तसेच त्याने पत्नी लक्ष्मी हिला थंगारासू या तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडले. त्यानंतर संतापाने लाल झालेल्या कोलंजी याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला तिथे ठार मारले. त्यानंतरही राग शांत न झाल्याने त्याने त्यांची डोकी धडावेगळी केली.
त्यानंतर कोलंजी याने या दोघांचीही डोकी आपल्या दुचाकीला बांधली आणि तो वेल्लोर सेंट्रल जेलच्या गेटवर गेला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून लक्ष्मी आणि थंगारासू यांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे कोलंजी आणि लक्ष्मी यांच्या तीन मुलींना जबर धक्का बसला आहे. त्यांनी या भीषण हत्याकांडात आईला गमावले आहे, तर वडीत तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे या तिघींचाही सांभाळ करणारं कुणी उरलेलं नाही.