पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:40 IST2025-05-21T09:36:29+5:302025-05-21T09:40:03+5:30
न्यायमूर्ती दुपल्ला रमन येत्या २ जून रोजी निवृत्त होणार आहेत. यावेळी उन्हाळी सुट्टी सुरु असणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वीच निरोप समारंभ मंगळवारी ठेवण्यात आला होता.

पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
मध्य प्रदेशचे इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती दुपल्ला रमन यांच्या निवृत्तीनिमित्त फेअरवेलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपली पत्नी गंभीर आजारी आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी मी बदली मागितली होती. माणुसकीच्या आधारे ती दिली गेली असती, परंतू आता खूप उशीर झाला, अशा शब्दांत रमन यांनी माजी सरन्यायाधीशांवर टीका केली. यामुळे न्यायपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे.
रमन यांच्यानुसार त्यांच्याकडे बदलीसाठी पर्याय मागितले गेले होते. त्यांनी कर्नाटकचा पर्याय निवडला होता. तिथे पत्नीवर चांगले उपचार करता येतील. 'मी १ नोव्हेंबर २०२३ ला मध्य प्रदेश हायकोर्टाचे पद स्वीकारले होते. १९ जुलै २०२४ ला पत्नीवर उपचारासाठी ट्रान्सफर मिळावी म्हणून दुसऱ्यांदा अर्ज केला होता. परंतू, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मानवतेच्या आधारावर आणि वैद्यकीय पार्श्वभूमीवर निर्णय घेतील असे वाटले होते. सरन्यायाधीश यावर निर्णय घेऊ शकतात, परंतू आता उशीर झाला. मला त्रास देण्यासाठी चुकीच्या हेतूने मध्य प्रदेशात बदली करण्यात आली होती. ज्यांनी हे केले त्यांचा अहंकार मी पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे. हे महोदय आता निवृत्त झालेले असले तरी देव विसरणार नाही, क्षमा करणार नाही, अशा शब्दांची रमन यांनी माजी सरन्यायाधीशांवर टीका केली.
न्यायमूर्ती दुपल्ला रमन येत्या २ जून रोजी निवृत्त होणार आहेत. यावेळी उन्हाळी सुट्टी सुरु असणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वीच निरोप समारंभ मंगळवारी ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.