नवी दिल्ली : दिल्लीतील मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या एका कॅफे मालकाने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय पुनीत खुराणा त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुनीतची पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या छळामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप पुनीतच्या कुटुंबीयांनी केला आहे. पुनीत आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार होते. दोघांमध्ये कॅफेबाबत वादही सुरू होता. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुनीतने मृत्यूपूर्वी एक व्हिडीओही रेकॉर्ड केला, जो सध्या पोलिसांकडे आहे. सुमारे ५९ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये पुनीतने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचे कथन केले आहे.
पुनीतचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. तो दोन वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहात होता. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते. त्याच्या पत्नीने पुनीतचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक केले होते. पुनीतच्या आत्महत्येची तुलना बंगळुरूचे अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येशी केली जात आहे.