लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला भेट दिला ५० हजारांचा नवाकोरा फोन, सुरू करताच घरी आले पोलीस, नेमका प्रकार काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:32 IST2025-07-08T11:31:43+5:302025-07-08T11:32:12+5:30
Kolkata Crime News: एका वकिलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक महागडा नवाकोरा फोन भेट म्हणून दिला होता. या फोनची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. मात्र हा फोन सुरू करताच त्यांच्यासमोर एक भलतीच कायदेशीर समस्या निर्माण झाली.

लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला भेट दिला ५० हजारांचा नवाकोरा फोन, सुरू करताच घरी आले पोलीस, नेमका प्रकार काय?
आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी अगदी नवाकोरा आणि महागडा मोबाईल फोन खरेदी केला. त्याचं योग्य ते बिल जीएसटीसह भरलं आणि हा फोन सुरू केल्यावर काही दिवसांनी अचानक पोलिसांनी घरी येऊन या फोनवरून मोठा ऑनलाईन गुन्हा घडलेला आहे असं सांगितलं तर.... अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलकाता येथील एका वकिलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक महागडा नवाकोरा फोन भेट म्हणून दिला होता. या फोनची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. मात्र हा फोन सुरू करताच त्यांच्यासमोर एक भलतीच कायदेशीर समस्या निर्माण झाली.
कोलकाता येथील सॉल्ट लेक परिसरात राहणाऱ्या एका वकिलाने फेब्रुवारी महिन्यात ४९ हजार रुपयांचा एक फोन खरेदी केला होता. हा फोन अगदी नवाकोरा आणि कंपनीने खोक्यामध्ये पूर्णपणे बंद केलेला होता. दुकानदाराने फोन खरेदी केल्याची पावती जीएसटीसह या वकिलाला दिली, मात्र या वकिलाच्या पत्नीने फोन वापरायला सुरुवात केल्यावर काही दिवसांतच गुजरात पोलिसांनी त्यांच्या घरी धडक दिली.
तुम्ही जो मोबाईल फोन वापरत आहात त्या फोनचा वापर याआधी एका सायबर क्राईम केसमध्ये झालेला आहे. तसेच आम्ही फोनच्या आयएमईआय क्रमांकाच्या आधारावर शोध घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत, असे गुजरातमधील राजकोट येथील पोलीस ठाण्यातून आलेल्या या पोलिसांनी वकील आणि त्यांच्या पत्नीला सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती ऐकून अगदी प्रामाणिकपणे फोन खरेदी केलेल्या या जोडप्याला धक्का बसला.
त्यानंतर या वकिलांनी थेट कोलकाता येथील हरे स्ट्रीट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच हा मोबाईल फोन विकणाऱ्या दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. या दुकानदाराने आपल्याला जाणीवपूर्वक जुना आणि आधीच गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरला गेलेला फोन नवा असल्याचे सांगून विकल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन तपासाची जबाबदारी हे दुकान ज्या बोबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं त्या पोलिसांकडे सोपवली.
त्यानंतर पोलिसांनी दुकानकार आणि या फोनचं वितरण करणाऱ्या वितरकाला चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, दुकानाच्या कागदपत्रांमध्ये काहीच संशयास्पद आढललेलं नाही. त्यामुळे आता संशयाची सुई ही वितरकाकडे वळली आहे. पोलिसांनी फोन जप्त केला असून, फॉरेन्सिक तपासासाठी पुढे पाठवला आहे. त्यामाध्यमातून हा फोन आधी कुणाकडे होता आणि दुकानदाराला याची माहिती होती का? याची माहिती समोर येणार आहे.
त्याबरोबरच या दुकानातून विकला गेलेला हा एकच फोन असा होता की, आणखीही काही फोनची अशा प्रकारे विक्री झाली आहे. यामागे कुठली टोळी सक्रिय तर नाही ना, अशा प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.