वादानंतर पत्नीने केला घटस्फोटासाठी अर्ज, नाराज पतीने लग्नात सासरहून मिळालेल्या दुचाकीने तोडले ट्रॅफिक नियम, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:51 IST2025-02-09T16:50:32+5:302025-02-09T16:51:01+5:30
Bihar News: पती-पत्नीच्या नात्यामधील मतभेदातून होणाऱ्या वादाच्या अनेक बातम्या दररोज समोर येत असतात. दरम्यान, बिहारमधील मुझफ्फरपूर येथून पती-पत्नीमधील वादाचं अजब प्रकरण समोर आलं आहे.

वादानंतर पत्नीने केला घटस्फोटासाठी अर्ज, नाराज पतीने लग्नात सासरहून मिळालेल्या दुचाकीने तोडले ट्रॅफिक नियम, मग...
पती-पत्नीच्या नात्यामधील मतभेदातून होणाऱ्या वादाच्या अनेक बातम्या दररोज समोर येत असतात. दरम्यान, बिहारमधील मुझफ्फरपूर येथून पती-पत्नीमधील वादाचं अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने लग्नात सासरहून मिळालेल्या दुचाकीने सातत्याने ट्रॅफिकचे नियम तोडण्यास सुरुवात केली. ही दुचाकी पत्नीच्या नावावर असल्याने दंडाचे मेसेज तिला तिच्या मोबाईलवर येऊ लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने सुरवातीला दंड भरला. मात्र हा प्रकार न थांबल्याने तिने नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुझफ्फरपूर येथे राहणाऱ्या या महिलेचा दीड वर्षांपूर्वी पाटणा येथे विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या दीड महिन्यांनंतरच पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागले. तसेच दोघेही वेगळे झाले. पत्नी मुझफ्फरपूर येथे माहेरी निघून आली. तसेच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
त्यानंतर पतीने लग्नात सासरहून मिळालेल्या दुचाकीवरून ट्रॅफिकचे नियम तोडण्यास सुरुवात केली. ही दुचाकी पत्नीच्या नावावर होती. त्यामुळे निमय मोडल्यावर दंडाचे पैसे पत्नीच्या खात्यावर नोंदवले जाऊ लागले. तेव्हा पत्नीने दुचाकी परत देण्याची मागणी पतीकडे केली. मात्र पतीने घटस्फोटाचा निर्णय होईपर्यंत दुचाकी परत देण्यास नकार दिला.
याबाबत या महिलेने सांगितले की, मागच्या तीन महिन्यात वाहतूक पोलिसांनी चार वेळा दंड केला आहे. सुरुवातीला मी दंडाची रक्कम भरली. मात्र ही रक्कम वाढू लागल्याने नंतर मी रीतसर तक्रार केली.