पतीच्या मृत्यूनंतर सती गेली पत्नी? या ठिकाणी घडली धक्कादायक घटना, पोलीस म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 19:40 IST2024-07-15T19:40:20+5:302024-07-15T19:40:41+5:30
Chhattisgarh Crime News: देशामध्ये सतीप्रथा कायदेशीररीत्या बंद होऊन अनेक वर्षं लोटली आहेत. मात्र तरीही अधून मधून अशा धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत असते. आता छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एक महिला पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर उडी मारून सती गेल्याचे उघड झाले आहे.

पतीच्या मृत्यूनंतर सती गेली पत्नी? या ठिकाणी घडली धक्कादायक घटना, पोलीस म्हणतात...
देशामध्ये सतीप्रथा कायदेशीररीत्या बंद होऊन अनेक वर्षं लोटली आहेत. मात्र तरीही अधून मधून अशा धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत असते. आता छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एक महिला पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर उडी मारून सती गेल्याचे उघड झाले आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तसेच प्राथमित तपासामध्ये ही सती गेल्याची घटना नसल्याचे समोर येत आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक दिवांग पटेल यांनी सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून १० किमी दूर अंतरावर असलेल्या चिटककानी गावामध्ये जयदेव गुप्ता नावाच्या व्यक्तीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी स्वत: चितेवर बसून सती गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या महिलेला चितेवर बसून सती जाताना किंवा जळताना कुणीही पाहिलेले नाही. मात्र स्मशान भूमीत तिच्या वापरातील काही वस्तू सापडल्याने त्यावरून ही महिला सती गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणामध्ये चक्रधरनगर पोलिसांनी महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचाही दौरा केला. तिथे मिळालेल्या वस्तूंच्या आधारावर पुढील तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणी संबंधित महिलेच्या मुलाचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. या प्रकरणी सती जाण्याशिवाय इतर बाजूंनीही तपास केला जात आहे. या तपासानंतरच महिलेच्या मृत्युमागचं खरं कारण समोर येणार आहे.