CoronaVirus News: क्वारंटाईन केंद्रामधून पळ काढत रात्री १२ वाजता नवरा आला घरी; बायकोला बसला धक्का अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 14:07 IST2020-05-14T13:57:52+5:302020-05-14T14:07:53+5:30
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे.

CoronaVirus News: क्वारंटाईन केंद्रामधून पळ काढत रात्री १२ वाजता नवरा आला घरी; बायकोला बसला धक्का अन्...
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७८ हजारांवर पोहचली आहे. तर आतापर्यंत 2549 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र तरीदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढताना दिसून येत आहे. कोरोनावर मात करायची असेल तर प्रशासन, पोलीस, रुग्णालमधील नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हिमाचलमधील चंबा येथे क्वारंटाईन करण्यात आलेला रुग्ण घरी पळून गेला. नवरा अचानक रात्री १२ वाजता घरी आल्याने बायकोला देखील धक्काच बसला. यानंतर बायकोने नवरा घरी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच रुग्णाला पुन्हा क्वारंटाईन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच क्वारंटाईनच्या उल्लंघनप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. मात्र हे सर्व असताना संबंधित रुग्णाच्या बायकोने वेळीच खबरदारी दाखवल्यामुळे स्थानिक पोलिसांनी तिचे कौतुक केले आहे.