मुस्लीम कायद्यानुसार विधवेचा वारसा हक्क वैध; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:31 IST2025-10-18T09:30:47+5:302025-10-18T09:31:14+5:30
विक्रीचा करार मालकीहक्क देत नाही व अशा करारातून कोणताही कायदेशीर हक्क हस्तांतरित होत नाही, हा कायद्यातील प्रस्थापित सिद्धांत आहे. विक्रीखत हे चंद खान यांच्या मृत्यूनंतरच झाले. मृत्युसमयी मालमत्ता त्यांच्या नावावर होती. मृत्यूनंतर ती संपत्ती मत्रुका म्हणून समजली जाते.

मुस्लीम कायद्यानुसार विधवेचा वारसा हक्क वैध; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : एखादी मालमत्ता विकण्याचा करार केल्याने तिचे मालकी हक्क हस्तांतरित होत नाहीत. मालमत्ता विक्रीचा करार म्हणजे मालकीहक्क नव्हे. त्यामुळे मृत व्यक्तीने मागे ठेवलेली सर्व संपत्ती ही मुस्लीम वारसाहक्क कायद्यानुसार विभागली जावी व त्याला मत्रुका संपत्ती मानले जावे, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. संजय कर्ण व प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला.
नेमके प्रकरण काय आहे?
मुंबईत राहणाऱ्या झोहरबी या महिलेचा पती चंद खान याचा मृत्यू झाला. दोघांना अपत्य नव्हते. त्यामुळे चंद खान याच्या पश्चातील संपत्तीत आपला तीन चतुर्थांश वाटा असल्याचा दावा झोहरबी यांनी केला. चंद खान याच्या पश्चातली संपत्ती ही मत्रुका संपत्ती असून मुस्लीम कायद्यानुसार ती विभागली जावी, असे त्यांचे म्हणणे होते. पण, चंद खान यांचा भाऊ इमाम खान यांनी हा दावा फेटाळत चंद खान यांनी जिवंतपणीच काही मालमत्ता विक्रीकराराद्वारे इतरांना दिल्या होत्या. त्यामुळे झोहरबी यांना तो हक्क नसल्याचे म्हटले.
न्यायालयाने काय म्हटले...
विक्रीचा करार मालकीहक्क देत नाही व अशा करारातून कोणताही कायदेशीर हक्क हस्तांतरित होत नाही, हा कायद्यातील प्रस्थापित सिद्धांत आहे. विक्रीखत हे चंद खान यांच्या मृत्यूनंतरच झाले. मृत्युसमयी मालमत्ता त्यांच्या नावावर होती. मृत्यूनंतर ती संपत्ती मत्रुका म्हणून समजली जाते.
अनुवादावर नाराजी
अरबी शब्द मत्रुका व त्याला अनुसार माहिती याचा अनुवाद कनिष्ठ न्यायालयाने योग्य केला नव्हता, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली. अरबी भाषेत मत्रुका म्हणजे एका मृत व्यक्तीने मागे सोडलेली मालमत्ता असा अर्थ आहे. तिचे विभाजन मुस्लीम वारसा कायद्यानुसार होते.