पाकिस्तानच्या विनंतीनंतरच युद्धबंदी; राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला, म्हणाले, "पुन्हा असं झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:21 IST2025-07-28T15:19:45+5:302025-07-28T15:21:42+5:30

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धबंदी का केली याची माहिती दिली आहे.

Why Operation Sindoor was stopped Defence Minister Rajnath Singh told the real reason in Lok Sabha | पाकिस्तानच्या विनंतीनंतरच युद्धबंदी; राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला, म्हणाले, "पुन्हा असं झालं तर..."

पाकिस्तानच्या विनंतीनंतरच युद्धबंदी; राजनाथ सिंह यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला, म्हणाले, "पुन्हा असं झालं तर..."

Operation Sindoor: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चेला सुरुवात झालीय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात करत ऑपरेशन सिंदूर हे लष्कराच्या तिन्ही दलांचे एक अतुलनीय उदाहरण असल्याचे म्हटलं. पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर देण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले नाही. पाकिस्तानने याचना केल्यानंतर युद्धबंदी करण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाही राजनाथ सिंह यांनी खोडून काढला. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने आपणच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याचे म्हणत होते. मात्र राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धबंदी केल्याचे म्हटलं. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा चुकीची घटना घडली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु करणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

"६-७ मे च्या रात्री सैन्याने ऐतिहासिक ऑपरेशन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लोकांचा धर्म विचारून मारले गेले. त्यानंतर पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि निर्णायक कारवाईची परवानगी दिली. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. माता-भगिनींच्या सिंदूरचा बदला सैन्याने दहशतवाद्यांकडून घेतला. मी खूप काळजीपूर्वक बोलत आहे, या ऑपरेशनमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. मृतांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे," असं राजनाथ सिंह म्हणाले.

हे हल्ले आक्रमक स्वरूपाचे नव्हते. पाकिस्तानने लष्करी तळांवर हल्ला केला. आम्ही हे हल्ले हाणून पाडले. आमची कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती. ७ मे पासून १० मे च्या रात्री १:३० वाजेपर्यंत पाकिस्तानने हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला. त्यांचे लक्ष्य आमचे लष्करी तळ होते. आमच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आणि पाकिस्तान कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करू शकला नाही. भारतीय सैन्याने शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावला, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"भारताने हे ऑपरेशन थांबवले कारण आम्ही ठरवलेले सर्व पूर्ण केले होते. भारताने दबावाखाली हे ऑपरेशन थांबवले असे म्हणणं पूर्णपणे चुकीचे आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा उद्देश वर्षानुवर्षे पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवाद्यांच्या नर्सरी नष्ट करणे हा होता. आमच्या सैन्याने फक्त त्यांनाच लक्ष्य केले जे या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन भारताला लक्ष्य करत होते. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणे नव्हता. १० मे रोजी सकाळी जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने पराभव स्वीकारला. पाकिस्तानने आमच्या डीजीएमओनीं म्हटले की आता थांबा. ऑपरेशन सिंदूर फक्त थांबवण्यात आले आहे. जर पाकिस्तानच्या बाजूने काही घडले तर ही ऑपरेशन पुन्हा सुरू होईल. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला आणि ऑपरेशन थांबवण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंमध्ये संवाद झाला आणि ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, १४० कोटी लोकांनी सैन्याचे शौर्य पाहिलं," असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.
 

Web Title: Why Operation Sindoor was stopped Defence Minister Rajnath Singh told the real reason in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.