धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 05:43 IST2025-07-23T05:42:27+5:302025-07-23T05:43:11+5:30
जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्याची संसदेच्या आवारात दिवसभर चर्चा होती.

धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्याची संसदेच्या आवारात दिवसभर चर्चा होती. संसदेच्या आवारात उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला धनखड यांनी राजीनामा का दिला' हा एकच प्रश्न विचारत होता.
धनखड यांच्या काही वक्तव्यांमुळे सरकार आणि सत्ताधारी पक्ष नाराज होता. कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कार्यक्रमातच धनखड यांनी सरकार शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीच का करीत नाही, असे विधान केले होते. न्यायपालिकेवरही निशाणा साधला होता. धनखड यांच्या अशा विधाणांमुळे सरकारला अनेकदा बॅकफूटवर यावे लागले होते. यामुळे सगळीकडे त्यांच्याप्रती नाराजी वाढली होती, अशीही चर्चा खासदरांमध्ये होती.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरूद्धचा धनखड यांनी जो प्रस्ताव स्वीकारलेला होता त्यावर फक्त विरोधकांच्याच सह्या होत्या. प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती सत्तापक्षाला नव्हती. धनखड यांनी बोलाविलेल्या बिजनेस ॲडव्हायजरी कमेटीच्या बैठकीला सत्तापक्ष नेते उपस्थित नव्हते. धनखडही काही दिवसांपासून नाराज दिसत होते. वरिष्ठ अधिकारी आपले ऐकत नाही अशी त्यांची तक्रार होती.
खरे कारण २ नेत्यांनाच माहीत : विरोधी पक्ष
राजीनाम्यानंतर विरोधकांनी या अनपेक्षित निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. भाकपचे खासदार पी. संदोष कुमार यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोनच व्यक्ती धनखड यांच्या राजीनाम्यामागील खरे कारण सांगू शकतात.