कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 05:46 IST2025-07-16T05:45:53+5:302025-07-16T05:46:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भूतदया हे मानवीयदृष्ट्या महान कार्य; परंतु यापोटी भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून एखाद्याचा स्थानिक ...

कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भूतदया हे मानवीयदृष्ट्या महान कार्य; परंतु यापोटी भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून एखाद्याचा स्थानिक लोक छळ करीत असतील तर? नेमक्या अशा एका प्रकरणात छळापोटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. ‘अशा श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी का खाऊ घालत नाहीत?’, असा सवाल न्यायालयाने केला.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या न्यायपीठाने कठोर शब्दांत याचिकाकर्त्याच्या वकिलांना सुनावले. ‘अशा उदार लोकांसाठी आपण प्रत्येक गल्ली आणि रस्ता मोकळा सोडला पाहिजे का? इथे जनावरांसाठी जागेची मोकळीक आणि माणसांसाठी कुठे जागा नाही, अशी स्थिती आहे. तुम्हाला भटक्या श्वानांचे पोट भरण्यापासून कुणी रोखत नाही; पण तुम्ही तुमच्या घरीच ही व्यवस्था का करीत नाही?’, असे कोर्टाने सुनावले.
याचिकाकर्त्याचा युक्तिवाद
वकिलांनुसार, याचिकाकर्त्याला स्थानिक लोक त्रास देत असल्याने प्राणी जन्म नियंत्रण नियमानुसार भटक्या श्वानांना खाऊ घालण्यात अडचण येत आहे. जेथे लोकांचा वावर नाही अशा ठिकाणी श्वानांसाठी अन्न पुरवण्याची व्यवस्था करता येऊ शकते.
प्रकरण काय? : हे प्रकरण मार्च २०२५ मधील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित आहे. स्थानिक प्रशासनाने या श्वानांना खाऊ घालण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
न्यायालयाची भूमिका
सकाळी फिरायला जाणाऱ्यांसह सायकलस्वार, दुचाकी वाहनचालकांना या श्वानांपासून अधिक धोका आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना विचारले, ‘तुम्ही सकाळी सायकल चालवता? एकदा चालवून पाहा काय होते ते.’