फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 21:57 IST2025-12-13T21:56:47+5:302025-12-13T21:57:40+5:30
Lionel Messi Tour India: कोलकाता येथे आलेल्या मेस्सीची एक झलक पाहण्याची चाहते आतुर होते. परंतु, हजारोंच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे पाहायला मिळाले.

फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
Lionel Messi Tour India: फुटबॉलचा जादूगार मानला गेलेला लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे. पश्चिम बंगाल येथील साल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सी आला होता. यावेळी हजारो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आले होते. परंतु, या स्टेडियमवर एकच गोंधळ उडाला आणि मेस्सीला अवघ्या काही मिनिटातच तेथून काढता पाय घ्यावा लागला. या प्रकाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली असून, फुटबॉल चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. यातच केवळ २२ मिनिटांतच मेस्सीला मैदान का सोडावे लागले, याचे एक कारण समोर आले आहे.
लिओनेल मेस्सीचा बहुप्रतिक्षित कोलकाता दौरा अवघ्या २२ मिनिटांत संपला. साल्ट लेक स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. मेस्सीचा GOAT टूरचा भाग म्हणून कोलकाता भेटीचा दिवस भारतातील फुटबॉलसाठी एक संस्मरणीय दिवस असेल, अशी अपेक्षा होती. परंतु अगदी उलट घडले. फिफा विश्वचषक विजेत्या मेस्सीच्या आगमनाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. शनिवारी सकाळीच त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी जमली होती. परंतु, योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
चाहत्यांचा मेस्सीला वेढा अन् त्याची असहाय्यता
सकाळी ८ वाजता स्टेडियमचे सर्वांसाठी खुले करण्यात आले. मेस्सी सकाळी ११.३० वाजता त्याच्या इंटर मियामी संघातील खेळाडू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉलसह मैदानात दाखल झाला. मेस्सी मैदानात येताच हजारो चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. या स्टेडियममध्ये सुमारे ५० हजार प्रेक्षक जमले होते. त्यापैकी अनेकांनी ४ हजारांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे खरेदी केली होती. दिग्गज राजकारणी, व्हीव्हीआयपी, सेल्फी घेण्यात रस असलेल्या लोकांच्या गर्दीने मेस्सीला वेढून टाकले आणि असहाय्यपणे मेस्सी ते सगळे पाहत होता, असे म्हटले जात आहे.
कृपया त्यांना एकटे सोडा, मैदान रिकामे करा
काही मिनिटांतच मेस्सीला राजकारणी, पोलीस अधिकारी, व्हीआयपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेढले. त्यामुळे चाहते ज्याची एक झलक पाहण्यासाठी आले होते, त्या मेस्सीला पाहूही शकले नाहीत. आश्चर्यचकित होऊन आणि किंचित हसत, मेस्सीने मैदानाभोवती हळूवारपणे प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. काही माजी खेळाडूंना स्वाक्षरी देण्याचा प्रयत्न केला, परंतु गोंधळ वाढतच गेला. मेस्सीजवळ गर्दी न करण्याचे, मेस्सीला एकटे सोडण्याचे तसेच मैदानात गर्दी न करण्याचे आवाहन प्रवर्तक सताद्रु दत्ता यांनी वारंवार करत होते. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीला स्टेडियममधून बाहेर नेले
सताद्रु दत्ता यांच्या आवाहनांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी सुरक्षेच्या कारणास्तव नियोजित एका तासाच्या कार्यक्रमाच्या खूप आधी मेस्सीला स्टेडियममधून बाहेर नेण्यात आले. कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. स्टेडियमची तोडफोड करण्यात आली. मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांपैकी एक सौरव गांगुली यांनी मेस्सीला जास्त काळ मैदानात थांबण्यास राजी करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आयोजक, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरुप बिस्वास आणि राज्य पोलीस महासंचालक राजीव कुमार हे मेस्सीच्या टीमशी बोलताना आणि त्यांना पुढे जाण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करताना दिसले. यादरम्यान, तुम्ही थोडा जास्त वेळ थांबलात तर बरे होईल, अशी विनंती सौरव गांगुली यांनीही केली. परंतु, हे प्रयत्न निष्फळ ठरले.