देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 07:31 IST2025-12-08T07:30:46+5:302025-12-08T07:31:36+5:30
लाखो प्रवाशांना भुर्दंड; विमानतळांवर गर्दी रेल्वेसारखी

देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी एअरलाइन इंडिगोने तिच्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या ऑपरेशनल संकटामुळे शेकडो उड्डाणे रद्द केली आहेत. नवीन नियमांनुसार पायलट ड्यूटी मर्यादेत बदल आणि इंडिगोच्या कमी कर्मचारी मॉडेलमुळे हे संकट निर्माण झाले आहे.
कोणत्या नियमांनी इंडिगोवर संकट?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिट नियमांमध्ये कठोरता आणली. नव्या नियमांनुसार, वैमानिकांचा आठवड्याचा विश्रांतीचा कालावधी ३६ तासांवरून ४८ तासांपर्यंत वाढवला, रात्रीच्या उड्डाणांची संख्या मर्यादित करण्यात आली आणि सलग रात्रीची ड्यूटी फक्त दोनपर्यंत मर्यादित
करण्यात आली. यामुळे प्रत्येक पायलटद्वारे चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली.
इंडिगो म्हणते...
पायलटची संख्या पुरेशी, फक्त ‘बफर’ कमी; हायरिंग बंद नाही, व्यवस्थापकीय त्रुटी सुधारत आहोत; रूट कॉज ॲनालिसिस सुरू आहे.
फटका नेमका कसा बसला? : इंडिगोला तिच्या एअरबस ए३२० विमानांसाठी २,४२२ कॅप्टनची आवश्यकता होती; परंतु फक्त २,३५७ कॅप्टन उपलब्ध होते आणि प्रथम अधिकाऱ्यांचीही कमतरता होती. याव्यतिरिक्त, विमानांचा जास्त वापर आणि रात्रीच्या उड्डाणांवर अवलंबून राहण्याचे एअरलाइनचे मॉडेल अपयशी ठरले. ज्यामुळे २ डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करण्यात आली. रविवारी २,३०० पैकी ६५० उड्डाणे रद्द करण्यात आली.
नेमका फटका कुठे बसला?
दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या प्रमुख विमानतळांवर लांब रांगा, सामान हरवले आणि त्रासलेले प्रवासी दिसले. अनेक प्रवाशांनी महत्त्वाच्या बैठका, मुलाखती आणि लग्ने चुकवली.
तांत्रिक बिघाड, हवामान, हिवाळी वेळापत्रक आणि नवीन क्रू नियमांमुळे त्या समस्या निर्माण झाल्या असे इंडिगोने सांगितले.
मागावी लागली माफी?
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांनी ५ डिसेंबर रोजी माफी मागितली आणि १०-१५ डिसेंबरदरम्यान पूर्ण सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
स्वस्त भाडे ४०,००० वर
या संकटामुळे देशांतर्गत विमान भाड्यात वाढ झाली. उदाहरणार्थ, दिल्ली-बंगळुरू विमानाचे सर्वांत स्वस्त भाडे ४०,००० रुपयांपेक्षा जास्त झाले. सरकारने ६ डिसेंबर रोजी सर्व विमान कंपन्यांसाठी भाडे मर्यादित केले. मात्र, यात अनेक प्रवाशांना भुर्दंड बसला.