गरीब सवर्णांना आरक्षणाची घोषणेसाठी साडे चार वर्षे का लागली? शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:44 IST2019-01-08T19:14:51+5:302019-01-08T19:44:57+5:30
केंद्र सरकारने गरीब सवर्णांसाठी घोषित केलेल्या 10 टक्के आरक्षाणासंदर्भातील विधेयक आज लोकसभेत सादर झाले.

गरीब सवर्णांना आरक्षणाची घोषणेसाठी साडे चार वर्षे का लागली? शिवसेनेचा सवाल
नवी दिल्ली - केंद्र सरकारने गरीब सवर्णांसाठी घोषित केलेल्या 10 टक्के आरक्षाणासंदर्भातील विधेयक आज लोकसभेत सादर झाले. दरम्यान, या विधेयकावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रतिनिधी आपापली भूमिका मांडत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही 'देर आये दुरुस्त आये' म्हणत विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मात्र गरीब सवर्णांना आरक्षणाची घोषणेसाठी साडे चार वर्षे का लागली? असा सवाल उपस्थित केला.
गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकावर लोकसभेमध्ये सुरू असलेल्या चर्चेत शिवसेनेकडून ज्येष्ठ खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाग घेतला. गरीब सवर्णांना आरक्षणाची घोषणेसाठी साडे चार वर्षे का लागली? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. तसेच देर से आए पर दुरुस्त आए म्हणत या विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे संकेत दिले. मात्र सवर्णांना आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू असताना अडसूळ यांनी महाराष्ट्रातील महादेव कोळी, धनगर, गोवारी यांच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला.