हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या धक्कादायक पराभवासंदर्भात सविस्तर चौकशी करणाऱ्या काँग्रेसच्या तथ्य शोधन समितीच्या प्रमुखांनी मतमोजणीदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये विसंगतीचा आरोप करत 'अंतरिम अहवाल' जारी केला. आठ सदस्यीय समितीचे प्रमुख तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते करणसिंग दलाल यांनी सोमवारी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. “विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक सर्वेक्षण काँग्रेसच्या बाजूने होते, राज्यातील वातावरणही काँग्रेसच्या बाजूने होते. मात्र, परिणाम उलटेच आले," असे दलाल यांनी म्हटले आहे.
दलाल यांनी पक्षाच्या पराभावाची अनेक कारणे सांगितली आहेत. तसेच, सत्ताधारी भाजपवर सरकारी यंत्रणेचा आपल्या पक्षाविरोधात दुरुपयोग केल्याचा आरोपही केला. भाजप 48 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आला आहे. काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत. तर पाच जागा इतरांनी जिंकल्या आहेत.
EVM च्या मतांमध्ये विसंगती -दलाल यांनी आरोप केला आहे की, “इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (EVM) बॅटरी 99 टक्क्यांपर्यंत चार्ज राहण्याचा मुद्दा काँग्रेसने उचलला होता आणि मतमोजणीच्या संथ गतीचाही एक मुद्दा होता.” त्यांनी आरोप केला आहे की, “ सविस्तर विश्लेषणात अनेक बुथववर ईव्हीएमच्या मतांमध्ये विसंगती आढळून आले आहे. ज्या भागांत भाजपला थोड्या फरकाने विजय मिळाला, तेथे मते वाढली आहेत. मतदान संपल्यानंतर पंचकुला जिल्हा आणि चरखी दादरी जिल्ह्यात अनुक्रमे 10.52 टक्के आणि 11.48 टक्के ईव्हीएम मतांमध्ये वाढ झाली आहे. हे इतर गंभीर संकेत आहेत. हे सर्व मुद्दे, या प्रक्रियेत गंभीर घोटाळा झाल्याचे संकेत देतात.”
निवडणूक आयोगावर प्रश्न -याच वेळी, दलाल यांनी संबंधित अहवालाचा हवाला देत, "...ईसीआयचे (भारत निवडणूक आयोग) आचरण निष्पक्ष नाही. यात पारदर्शकतेचा आभाव आहे. यांचा दृष्टिकोण उदासीन आहे,” असा आरोपही केला आहे. तत्पूर्वी काँग्रेसने निवडणूक निकाल समोर येताच अनेक आरोप केले होते. मात्र निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप फेटाळून लावले होते.