अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून का पाठवलं? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:37 IST2025-02-06T15:31:23+5:302025-02-06T15:37:33+5:30
S. Jaishankar News: अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.

अमेरिकेने भारतीयांना विमानातून हातपाय बांधून का पाठवलं? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलं असं उत्तर
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून अमेरिकेने देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, बेकायदेशीररीत्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीय नागरिकांपैकी काही जणांना अमेरिकन प्रशासनाने काल एका विशेष लष्करी विमानातून भारतात परत पाठवले होते. मात्र अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी आज संसदेत गदारोळ माजल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.
एस. जयशंकर राज्यसभेत या प्रकरणी उत्तर देताना म्हणाले की, आपले नागरिक जर परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे दिसून आले तर त्यांना परत आपल्याकडे घेणं ही सर्व देशांची जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये अशा बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना माघारी पाठवण्याची प्रक्रिया तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट ऑथॉरिटी करते.
भारतीय नागरिकांना हातपाय बांधून पाठवण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, २०१२ पासून लागू झालेल्या एका नियमानुसार जेव्हा लोकांना विमानातून माघारी पाठवण्यात येतं, तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधून ठेवण्यात येतं. दरम्यान, आयसीईने दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत महिला आणि मुलांना सवलत देत या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जातं. म्हणजेच त्यांना बांधून ठेवलं जात नाही. जयशंकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे अमेरिकेतून परत पाठवल्या जाणाऱ्या नागरिकांसोबत कुठल्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये, यासाठी आम्ही अमेरिकन सरकारसोबत सातत्याने चर्चा करत आहोत.
दरम्यान, आज अमेरिकेतून माघारी पाठवण्यात आलेल्या नागरिकांच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. या गोंधळादरम्यानच सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणी मंत्र्यांनी स्षटीकरण देणं आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर एक. जयशंकर यंनी सभागृहात या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.