महिलांमध्ये मल्टिटास्किंग क्षमता अधिक का? मेंदूच्या रचनेमध्ये दडले आहे यामागचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:38 IST2025-03-09T12:37:43+5:302025-03-09T12:38:01+5:30
महिलांच्या मेंदूमध्ये कोर्टिकल थिकनेस अधिक असल्याने त्यांची प्रक्रिया करण्याची क्षमता चांगली असते.

महिलांमध्ये मल्टिटास्किंग क्षमता अधिक का? मेंदूच्या रचनेमध्ये दडले आहे यामागचे रहस्य
नवी दिल्ली: शिक्षण असो किंवा कामधंदा, खेळ असो किंवा सौंदर्य, देशात महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये चांगले यश कमावले आहे. या यशामध्ये अर्थातच त्यांच्या मेंदूचे योगदान सर्वात मोठे आहे. सायकॉलॉजी टुडे या नियतकालिकाने अलिकडे एका प्रकल्पाद्वारे महिला आणि पुरुषांच्या मेंदूमधील शास्त्रीय फरकाचा अभ्यास केला.
त्यात दिसून आले की महिला आणि पुरुषांच्या मेंदूची रचना, चालणारे काम, न्यूरोकेमिकल्सच्या बाबतीत फरक आहे. परंतु, बुद्धिमत्ता आणि क्षमता यात फारसा फरक नाही. पुरुषांचा मेंदू आकाराने थोडा मोठा असतो. महिलांच्या मेंदूमध्ये कोर्टिकल थिकनेस अधिक असल्याने त्यांची प्रक्रिया करण्याची क्षमता चांगली असते. दोघांच्या मेंदूतील न्यूरोकेमिकल एकसारखा प्रतिसाद देतात. महिलांमध्ये सेरोटोनिन तणाव शांत करण्यास मदत करते. तर पुरुषांमध्ये हेच न्युरोकेमिकल शारीरिक हालचाली करण्याची क्षमता आणि ऊर्जा वाढवत असते.
प्रक्रिया करण्याची अधिक क्षमता कशामुळे?
पुरुषांचा मेंदू मेंदूतील प्रक्रियांमध्ये ७ पट अधिक ग्रे मॅटरचा वापर केला जातो तर महिलांच्या मेंदूमध्ये १० पट अधिक व्हाईट मॅटरचा वापर केला जातो. या प्रक्रियांमध्ये सूचना आणि कृती यांचा मेळ साधला जात असतो. यामुळे पुरुष एकाच कामावर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतात.
महिला एकाच वेळी अधिक कामांवर लक्ष देऊ शकतात, त्या कामाच्या स्वरुपात चटकन बदल करू शकतात. यामुळेच त्यांच्या मल्टि टास्किंगची क्षमता अधिक असते, असे हा अभ्यास सांगतो.