"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:42 IST2025-11-11T12:29:59+5:302025-11-11T13:42:33+5:30
दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारांना सोडणार नसल्याचे म्हटलं.

"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
PM Modi on Delhi Blast: सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सध्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाषण देताना त्यांनी दिल्ली स्फोटातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले.
भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी आज जड अंतःकरणाने येथे आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने सर्वांना खूप दुःख झाले आहे. मी पीडित कुटुंबाचे मला दुःख मला समजत आहे. संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व तपास यंत्रणांशी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व प्रमुख लोकांशी मी काल रात्रभर संपर्कात होतो. चर्चा सुरू होती आणि माहिती एकत्र केली जात होती. आमच्या तपास यंत्रणा या कटाच्या तळाशी जातील. यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही."
दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, तपास संस्था या घटनेची जलद आणि सखोल चौकशी करत आहेत आणि लवकरच अहवाल सार्वजनिक केला जाईल. "मी देशवासीयांना खात्री देऊ इच्छितो की देशातील प्रमुख संस्था या अपघाताची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. तपासाचे निकाल लवकरच समोर येतील आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही," असे राजनाथ सिंह म्हणाले.
दिल्लीत सोमवारी संध्याकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हुंडई आय-२० कारचा उपयोग करुन हा स्फोट घडवण्यात आला. सीसीटीव्ही फूटेजनुसार ही कार दुपारी ३.१९ मिनिटांनी लाल किल्ला परिसरातील पार्किंगमध्ये आली होती. त्यानंतर संध्याकाळी ६.४८ वाजता कार निघून लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळ आली. त्यानंतर या कारचा भयावह स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झालं. मोठ्या आवाजानंतर शरीराचे अवयव दूरवर फेकले गेले.