भारत-पाकिस्तान संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी मात्र त्यांनी आपण जिंकल्याचा आव आणत, जगभरात आपलाच विजय झाल्याचे म्हटले होते. मात्र, काही गोष्टी समोर आल्या आणि पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्याचे सगळ्यांच्या समोर आले. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा सगळ्यांसामोर उघडा पडला. आता भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यावर टीका केली आहे.
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मद्रास येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची अवस्था कशी झाली होती, ते देखील सांगितले. यावेळी बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, 'जर तुम्ही कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला विचारलं की, युद्ध कुणी जिंकलं? तर, ते नक्की हेच म्हणतील की, आम्हीच जिंकलो, म्हणूनच आमचा प्रमुख फील्ड मार्शल झाला.'
या व्यक्तव्यातून जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या फील्ड मार्शलपदी नियुक्तीवरही टीका केली आहे. यासोबतच, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ते म्हणाले की, "केंद्र सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. यामुळेच आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यात यशस्वी झालो आहोत."
लष्करप्रमुख म्हणाले की,एक नरेटीव्ह मॅनेजमेंटद्वारे पाकिस्तानी सैन्याने जनतेला विश्वासात घेतले आहे. तेथील संघर्षाबद्दल सोशल मीडियावर एक खोटी कथा तयार केली गेली. यामुळेच पाकिस्तानच्या लोकांना अजूनही वाटते की, ते जिंकले आहेत. याद्वारे युद्धादरम्यान एक अशी कथा तयार केली गेली, ज्यात आपण जिंकत आहोत हे दाखवले गेले.
काहीतरी मोठे करण्याचे आदेश आले!पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. सर्वांना पाकिस्तानकडून बदला घ्यायचा होता. हल्ल्याच्या २४ तासांच्या आत संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत थेट आणि स्पष्ट आदेश देण्यात आले. आता काहीतरी मोठे करायचे आहे. आता हे पुरे झाले. आम्हाला, लष्कर प्रमुखांना, पाकिस्तानकडून बदला घेण्याची संपूर्ण रणनीती बनवण्याचे काम देण्यात आले होते. या विश्वासामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विधान केले. याआधी हवाई दल प्रमुखांनी काल सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाकिस्तानचे ५ लढाऊ विमान पाडले आहेत. ३०० किलोमीटर आत घुसून आम्ही त्यांना धडा शिकवला आहे.