उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:06 IST2025-07-22T18:05:31+5:302025-07-22T18:06:30+5:30
New vice president of india after jagdeep dhankhar: जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला असून, आता उपराष्ट्रपती पदावर कोण बसणार?

उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
New vice president of india 2025 : प्रकृतीच्या कारणामुळे जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून, नवीन उपराष्ट्रपती कोण असणार? या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी तीन नावांची सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहे. घटनेच्या परिशिष्ट ६८ नुसार पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. म्हणजेच सप्टेंबर २०२५ पर्यंत नवीन उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी कोणत्या नावांची चर्चा?
राष्ट्रीय राजकारणात नवीन उपराष्ट्रपतीची निवड बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी होईल, अशी चर्चा आहे. गेल्या काही वर्षात घटनात्मक पदावर झालेल्या निवडी, नियुक्त्या या कुठल्या ना कुठल्या निवडणुकीच्या तोंडावर झाल्या आहेत. त्यामुळे भाजप बिहार निवडणुकीच्या अनुषंगानेच हा निर्णय घेईल असे म्हटले जात आहे.
बिहार विधानसभा निवडणूक केंद्रस्थानी ठेवून राज्यसभेचे उपसभापति हरिवंश नारायण सिंह आणि स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांचे सुपुत्र रामनाथ नारायण ठाकूर या दोघांच्या नावाची चर्चा आहे.
यात तिसरे नाव शर्यतीत आहे ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे. पण, नितीश कुमार उपराष्ट्रपती बनण्यास तयार होतील, याबद्दल साशंकताच जास्त आहे.
रामनाथ ठाकूर जर उपराष्ट्रपती बनले तर त्याचा फायदा भाजपला बिहार निवडणुकीत होईल, असा एक चर्चेचा सूर आहे. कारण रामनाथ ठाकूर हे ईबीसी प्रवर्गातून येतात. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्पुरी ठाकूर यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली देण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.
यात सर्वात आघाडीवर नाव आहे, हरिवंश नारायण सिंह याचे. राज्यसभेचे कामकाज चालवण्यासाठी सध्या ते सक्षम व्यक्ती असल्याचे मानले जात आहे. हरिवंश नारायण सिंह हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेदयूचे नेते आहेत. त्याचबरोबर उपसभापती म्हणून काम करत असल्यामुळे राज्यसभेच्या कामाचा अनुभवही त्यांना आहे.
सध्या या नावांची चर्चा असली, तर भाजपने अनेक वेळा महत्त्वाच्या पदासाठी धक्का दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपने महत्त्वाच्या पदावर पक्षातील नेत्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता हे पद पक्षाबाहेर दिले जाईल का, याबद्दल साशंकता आहे. आता चर्चा या नावांची असली, तर भाजपकडून कोणते नाव ऐनवेळी पुढे केले जाणार, याबद्दलची उत्सुकता आहे.