कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:14 IST2025-07-03T15:48:34+5:302025-07-03T17:14:29+5:30
दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवरून भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले...
सध्या दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण असणार, याची चर्चा सर्वत्र होत आहे. अवघ्या जगाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. सध्याचे दलाई लामा हे आता वयाची नव्वदी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आता त्यांचे अधिकार कुणाकडे जाणार याविषयी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पश्चात तिबेटी बौद्ध परंपरा टिकवून ठेवणं आवश्यक असल्याने, उत्तराधिकारी हा अतिशय महत्त्वाचा असतो. यातच चीनचा डोळा तिबेटवर असल्याने, या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. मात्र, आता तिबेटीयन दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवरून भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेलाच आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी ठामपणे सांगितले की, "दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड केवळ स्थापित परंपरा आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच केली जाईल. यामध्ये इतर कोणालाही अधिकार नाही."
दलाई लामांच्या संस्थेचे अधिकृत विधान
बुधवारी, दलाई लामांनी स्वतः स्पष्ट केले होते की त्यांची संस्था, 'गाडेन फोडरंग ट्रस्ट', हीच त्यांच्या भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देणारी एकमेव अधिकृत संस्था आहे. चीनने त्यांची उत्तराधिकार योजना फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान अधिक महत्त्वाचे ठरले आहे. किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "दलाई लामा ही बौद्धांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित संस्था आहे. त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की, हा अवतार केवळ स्थापित परंपरेनुसार आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच ठरवला जातो."
चीनच्या दाव्याला भारताचे प्रत्युत्तर
चीनने असा दावा केला होता की, भविष्यात कोणताही दलाई लामा चीनची मान्यता मिळाल्यासच वैध ठरेल. भारताने या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले आहे आणि तिबेटी परंपरेचा आदर करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. रिजिजू म्हणाले, "दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे इतर कोणतीही व्यक्ती किंवा देश ठरवू शकत नाही." किरेन रिजिजू स्वतः बौद्ध धर्माचे अनुयायी असून ते तिबेटी बौद्ध समुदायातील दलाई लामांच्या भूमिकेकडे आदराने पाहतात. त्यांचे हे विधान भारत सरकारची चीनविरोधात मजबूत आणि स्पष्ट भूमिका दर्शवते.
कसा निवडला जातो उत्तराधिकारी?
दलाई लामांच्या उत्तराधिकाराचा विषय फक्त धार्मिक नव्हे, तर राजकीय आणि भू-राजकीयदृष्टिकोनातूनही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म होतो, अशी बौद्ध श्रद्धा आहे. दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी शोधण्याची पारंपरिक प्रक्रिया दीर्घ आणि गुंतागुंतीची असते. ही प्रक्रिया बौद्ध भिक्षु, तिबेटी सरकार इन-एक्झाइल आणि धार्मिक संस्था पूर्ण करतात.
चीनचा हस्तक्षेप का?
दलाई लामा भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. भारत, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश तिबेटच्या धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन करतात. मात्र, चीन तिबेटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून तिथे धार्मिक स्वातंत्र्यावर बंधनं घालण्याचा प्रयत्न देखील होत आहे. यामुळेच पुढील दलाई लामा निवडीसाठी चीनची मान्यता घ्यावी लागले, असा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. दुसरीकडे, चीनकडून 'राजकीय दलाई लामा' अर्थात त्यांच्या नियंत्रणात असलेला एक चेहरा यासाठी निवडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दलाई लामांचा ९० वा वाढदिवस
दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस ६ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात भारत सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग उपस्थित राहणार आहेत. भारतात राहणारे बौद्ध दलाई लामांच्या शिकवणी आणि परंपरांचे पालन करतात, असेही रिजिजू यांनी म्हटले.