कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:03 IST2025-10-26T20:02:04+5:302025-10-26T20:03:43+5:30
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे...

कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. यामुळे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. सहसा, सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयांतील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना हे महत्त्वाचे पद मिळते आणि विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करतात. यानुसार, सीजेआय बीआर गवई यांनी आपल्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव पुढील सरन्यायाधीश म्हणून घोषित केले आहे.
सीजेआय गवई सोमवारी (२७ ऑक्टोबर) केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची औपचारिक शिफारस करणार आहेत. ते सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'सोबत बोलताना ते म्हणाले, "केंद्र सरकारकडून आपल्या कार्यालयाला पुढील सरन्यायाधीशांसाठी शिफारस मागवणारा संदेश मिळाला आहे. मी रविवार सायंकाळी दिल्लीला पोहोचेल आणि सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करेन."
न्यायमूर्ती सूर्यकांत सध्या सीजेआय गवई यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्यांचे संपूर्ण बालपण संयुक्त कुटुंबात गेले. त्यांनी गावातील सरकारी शाळांमध्येच मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
१९८४ मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी घेण्यापूर्वी त्यांनी १९८१ मध्ये हिसारमधून पदवी पूर्ण केली. न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी सूर्यकांत यांनी वरिष्ठ वकील म्हणून आणि हरियाणाचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले आहे. ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर २०२५ रोजी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.