निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:43 IST2025-07-15T20:42:27+5:302025-07-15T20:43:46+5:30
कंठापुरम मुसलियार यांनी धार्मिक आधारावर संवाद सुरू केला. येमेनच्या परंपरेनुसार 'ब्लड मनी'च्या माध्यमाने माफीचा मार्ग सुचवला गेला. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने माफीसाठी ८.६ कोटी रुपये देऊ केले आहेत.

निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
केरमधील नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशीची शिक्षा दिली जाणार होती. मात्र सध्या तिची शिक्षा टाळण्यात आली आहे. हे शक्य झाले आहे, भारतातील एका 94 वर्षीय वृद्ध धर्मगुरूंच्या पुढाकाराने. संपूर्ण जगात त्यांना 'ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते. कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार असे त्यांचे नाव आहे. ते भारतातील प्रमुख सुन्नी मुस्लीम नेते आहेत. त्यांनी येमेनचे प्रमुख सूफी धर्मगुरू शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्या माध्यमाने मृत तालाल अब्दो महदीच्या कुटुंबीयांपर्यंत चर्चेचा मार्ग प्रशस्त केला.
'धार्मिक संवादा'ने मार्ग प्रशस्त -
कंठापुरम मुसलियार यांनी धार्मिक आधारावर संवाद सुरू केला. येमेनच्या परंपरेनुसार 'ब्लड मनी'च्या माध्यमाने माफीचा मार्ग सुचवला गेला. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने माफीसाठी ८.६ कोटी रुपये देऊ केले आहेत.
कुठे आणि कशी झाली चर्चा? -
ही महत्त्वाची बैठक येमेनमधील धमार शहरात झाली. येथे मृताच्या कुटुंबाने फाशीचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले. यानंतर, येमेनच्या न्यायव्यवस्थेने निमिषाला १६ जुलै रोजी फाशी न देण्याचा निर्णय घेतला. तलाल अब्दो महदी यांचे कुटुंब हबीब उमर यांच्या सूफी पंथाशी देखील संबंधित आहे. यामुळे, कंठापुरम मुसलियार यांच्या विधानाला धार्मिक आदर मिळाला, यामुळे या संवादाला सकारात्मक दिशा मिळाली.
निमिषा प्रियावर नेमका काय आरोप? का सुनावण्यात आली फाशी? -
केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असलेली निमिषा प्रिया २००८ मध्ये रोजगारासाठी यमनला गेली होती. २०२० मध्ये येमेनमधील एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. हा व्यक्ती निमिषाचा व्यावसायिक भागीदार होता. ही घटना जुलै २०१७ मध्ये घडली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिचं अपील फेटाळून लावलं होतं आणि देशाच्या सरकारी अभियोजकाने आता तिला मंगळवार, १६ जुलै रोजी फाशी देण्याचा आदेश दिला आहे.