दरवर्षी लाखो उमेदवार UPSC नागरी सेवा परीक्षेला बसतात. त्यापैकी काही मोजकेच यशस्वी होतात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करतात. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशची मुलगी शांभवी मिश्रा हिने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर UPSC परीक्षेत यश मिळवलं. तिची यशोगाथा प्रत्येक बॅचसाठी खूप प्रेरणादायी आहे. तिने दोनदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.
शांभवी मिश्रा ही उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध जिल्हा अमेठी येथील रहिवासी आहे. तिच्यासाठी तिची स्वप्नं साकार करणं थोडं कठीण होतं. तिने सायन्समधून बारावी उत्तीर्ण केली. मग बी.टेकला प्रवेश घेतला आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. बीटेकच्या तिसऱ्या वर्षात असताना तिने सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला.
२०१७ मध्ये बीटेक उत्तीर्ण झाल्यानंतर शांभवी मिश्रा एका बँकेत पीओ म्हणून रुजू झाली होती. त्याच वर्षी तिला यूपीएससीची पहिलीच परीक्षा द्यावी लागली. नोकरी सुरू केल्यानंतर आठवडाभरातच तिची परीक्षा होती. तिची तयारी इतकी जोरदार होती की, तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC प्रिलिम्स आणि मेन पास केली पण ती मुलाखतीत अपयशी ठरली. यानंतर तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला परंतु रिजनल हेडने त्यांना रोखलं आणि त्यांच्या बाजूने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शांभवी मिश्राला ज्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली ते तिच्या घरापासून ४२ किमी दूर होते. घर ते बँक असा प्रवास करण्यासाठी तिला तब्बल ४ तास लागले. ती सकाळी बँकेत जाताना वृत्तपत्र वाचायची आणि परत येताना नोट्स वाचायची. तिच्या गावापासून बँकेच्या ठिकाणी जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट नव्हतं. त्यामुळे ती गाडीने ये-जा करत असे आणि जो वेळ मिळेल तो अभ्यास करत असे.
शांभवी मिश्राने २०१८ साली झालेल्या UPSC परीक्षेत १९९ वा क्रमांक पटकावला होता. यामुळे तिला आयपीएस कॅडर मिळालं. २०१९ मध्ये, ती ट्रेनिंगसाठी LBSNAA आणि नंतर हैदराबाद येथील पोलीस अकादमीमध्ये गेली. यानंतरही तिने यूपीएससी परीक्षेसाठी आणखी एक प्रयत्न केला. तिला आशा होती की ती आणखी चांगली कामगिरी करू शकेल. २०२१ मध्ये झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत तिने ११६ वा रँक मिळवला.