प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक श्रद्धेने सहभागी होत आहे. अनेकजण यावेळच्या महाकुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरले असून, आता २५ वर्षीय ममता वशिष्ठही महामंडलेश्वर बनली आहे. ममता वशिष्ठला किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण यांनी पिंडदान करून पट्टाभिषेक केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यावेळच्या महाकुंभमेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह आणि हर्षा रिछारिया यांची प्रचंड चर्चा झाली. दोघांचेही फोटो, व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. आता काही महिन्यांपूर्वी लग्न झालेली ममता वशिष्ठ चर्चेत आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
ममता वशिष्ठने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, तिचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं. नोव्हेंबर २०२४ मध्ये संदीप वशिष्ठसोबत ममताचं लग्न झालं होतं. ममताचा पती सरपंच आहे. ममताला वयाच्या सातव्या वर्षापासूनच धार्मिक गोष्टींबद्दल आवड निर्माण होत गेली. ममताला रविवारी (१९ जानेवारी) महामंडलेश्वर बनवण्यात आले.
ममता म्हणाली की, मला माझ्या कुटुंबातील आणि माझ्या पतीचा पूर्ण पाठिंबा आहे. माझ्या या निर्णयानंतर ते माझ्या पाठीशी उभे राहिले. तरीही काही असे लोक आहेत, जे माझ्या निर्णयाच्या विरोधात आहेत. माझी सहा वर्षांपूर्वी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी पार्वती नंद धुलिया यांच्याशी भेट झाली होती.