भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:55 IST2025-06-05T15:50:58+5:302025-06-05T15:55:49+5:30
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नुकत्याच केलेल्या तपासात, ‘मॅडम एन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेशी संबंधित धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या कारवायांबाबत मोठे खुलासे समोर येत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नुकत्याच केलेल्या तपासात, ‘मॅडम एन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौशाबा शहाबाद मसूद या महिलेशी संबंधित धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नौशाबा ही पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्करासाठी भारतात स्लीपर सेल आणि हेरगिरीचं जाळं उभारणाऱ्या मुख्य व्यक्तींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोण आहे मॅडम एन?
नौशाबा मसूद ही लाहोरस्थित व्यावसायिका असून ती झायना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम या ट्रॅव्हल कंपनीची मालक आहे. तिचा पती पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिसमधील निवृत्त अधिकारी आहे. आयएसआयच्या सूचनेनुसार, नौशाबा भारतात ५०० हेरांचं नेटवर्क सक्रिय करण्याच्या कामात तैनात होती.
तपासणीत उघड झालं आहे की, नौशाबा विशेषतः भारतातील हिंदू आणि शीख समुदायातील लोकांना लक्ष्य करत होती. तिने मागील सहा महिन्यांत सुमारे ३००० भारतीय नागरिक आणि १५०० परदेशस्थित भारतीयांना पाकिस्तानात नेण्यात मोठी भूमिका बजावली होती.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा वापर
नौशाबा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर्सना पाकिस्तानात आमंत्रित करून, त्यांची ओळख पाकिस्तानी लष्कर व आयएसआय अधिकाऱ्यांशी करून देत होती. युट्युबर ज्योती मल्होत्रालाही तिने पाकिस्तानात नेले होते.
पाकिस्तानी दूतावासात थेट संपर्क
तिचा दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या व्हिसा विभागावर मोठा प्रभाव होता. ती थेट फर्स्ट सेक्रेटरी व्हिसा सुहेल कमर, ट्रेड कौन्सिलर उमर शेरियार, आणि व्हिसा ऑफिसर असलेल्या आयएसआय एजंट दानिश यांच्याशी थेट संपर्कात होती. तिच्या शिफारसीवरून अनेक भारतीयांना लगेच व्हिसा मिळत होता.
अनधिकृत आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांची चौकशी
सुरक्षा यंत्रणांना नौशाबाच्या पाकिस्तान नंबरसह तिची दोन बँक खाती देखील मिळाली आहेत. ही खाती भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्ससोबत झालेल्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरले जात होते. याबाबत सध्या तपास सुरू आहे.
भारताशी तांत्रिक नियम मोडणाऱ्या योजना
भारत-पाकिस्तान दरम्यान पर्यटक व्हिसाची कोणतीही अधिकृत प्रक्रिया नसतानाही, नौशाबाच्या शिफारसीवरून ‘स्पॉन्सरशिप व्हिजिटर व्हिसा’ दिला जात होता. ती ईटीपीबीच्या सहकार्याने शीख आणि हिंदू धर्मीयांची यात्रा आयोजित करत होती. यातून ती मोठी आर्थिक कमाई करत होती आणि हा निधी पाकिस्तानच्या प्रचारासाठी वापरला जात होता.
अलीकडेच नौशाबाने दिल्ली व अन्य प्रमुख शहरांमध्ये तिचे एजंट नियुक्त केले होते, जे सोशल मीडियावर तिच्या ट्रॅव्हल एजन्सीचा प्रचार करण्याचे काम करून, लोकांना शोधत होते.