CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:44 IST2025-10-27T13:38:18+5:302025-10-27T13:44:22+5:30
Supreme Court CJI News: अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्या. सूर्यकांत यांनी न्यायदानाचे काम केले आहे.

CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
Supreme Court CJI News: २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहेत. यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण असणार, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच सरकारकडूनही याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केल्याचे सांगितले जात आहे. न्या. सूर्यकांत यांना सुमारे ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असल्याचे बोलले जात आहेत.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे मार्गदर्शन करणाऱ्या कागदपत्रांच्या संचातील मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची असावी, जे या पदासाठी योग्य मानले जाते. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची त्यांचा उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली. न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाभार स्वीकारतील.
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण?
न्या. सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९८४ मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून एलएलबी पदवी प्राप्त केली. २०११ मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकासह एलएलएम पदवी पूर्ण केली.
१९८५ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिली
१९८४ मध्ये हिसार जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. लगेचच १९८५ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी चंदीगडला गेले. संवैधानिक, नागरी आणि सेवा बाबींमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. अनेक विद्यापीठे, मंडळे आणि बँकांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ मध्ये त्यांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आणि नंतर ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
सर्वोच्च न्यायालयात बढती
२४ मे २०१९ रोजी न्या. सूर्यकांत सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. न्या. सूर्यकांत यांच्याकडे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, भ्रष्टाचार, पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयांवर न्या. सूर्यकांत यांनी न्यायदान केले.
दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनी संबंधित पत्राची प्रत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनाही दिली. २३ ऑक्टोबर रोजी सरकारने सरन्यायाधीश गवई यांना पत्र लिहून शिफारस पत्र पाठविण्याची विनंती केली होती. निवृत्त होणारे सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्यासाठी सरकारला पत्र लिहितात, ही आतापर्यंतची परंपरा आहे. सरकारकडून अधिसूचना निघाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश भूषण गवई आपले पद सोडतील. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाभार स्वीकारतील. न्यायमूर्ती सूर्यकांत या पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील.