कोण आहेत इस्रोचे नवे प्रमुख व्ही. नारायणन? स्पेस सायन्समध्ये चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:28 IST2025-01-08T12:27:46+5:302025-01-08T12:28:38+5:30
ISRO New Chief V Narayanan : व्ही. नारायणन हे एक प्रसिद्ध इस्रो शास्त्रज्ञ आहेत. ते सध्या केरळमधील वालियामाला येथे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे (LPSC) संचालक म्हणून कार्यरत आहेत.

कोण आहेत इस्रोचे नवे प्रमुख व्ही. नारायणन? स्पेस सायन्समध्ये चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव
ISRO New Chief V Narayanan : नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा अवकाश शास्त्रज्ञ व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली. ते १४ जानेवारी रोजी इस्रोचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
व्ही. नारायणन हे एक प्रसिद्ध इस्रो शास्त्रज्ञ आहेत. ते सध्या केरळमधील वालियामाला येथे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे (LPSC) संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय अंतराळ प्रोग्राममध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव असलेल्या व्ही. नारायणन यांनी इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ प्रोजेक्टमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इस्रोचे नवे प्रमुख व्ही. नारायणन यांचे शिक्षण तामिळ भाषिक शाळांमध्ये झाले. त्यांनी १९८९ मध्ये IIT-खरगपूर येथे प्रथम क्रमांकासह क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये M.Tech चे शिक्षण पूर्ण केले. एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी केली. M.Tech मध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना रौप्य पदक देण्यात आले होते.
व्ही. नारायणन १९८४ मध्ये इस्रोमध्ये रुजू झाले आणि केंद्राचे संचालक होण्यापूर्वी त्यांनी विविध पदांवर काम केले. सुरुवातीला सुमारे साडेचार वर्षे त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे ASLV आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानच्या (PSLV) ध्वनीक्षेपक रॉकेट आणि सॉलिड प्रोपल्शनच्या क्षेत्रात काम केले.
लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर वालियामालाचे संचालक म्हणून त्यांनी GSLV Mk III साठी CE२० क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासोबतच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी LPSC ने इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८९ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम आणि कंट्रोल पॉवर प्लांट तयार केले आहेत.
अनेक पुरस्कार मिळालेत
४० वर्षांच्या कारकिर्दीत व्ही. नारायणन यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शैक्षणिक कामगिरीची दखल घेत त्यांना IIT खरगपूरकडून रौप्य पदक, ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून सुवर्ण पदक आणि NDRF कडून राष्ट्रीय डिझाइन पुरस्कार मिळाला आहेत. तसेच, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते डिस्टिंग्विश्ड अलुम्नस अवॉर्ड २०१८ मिळाला होता.