व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:32 IST2025-11-14T06:32:10+5:302025-11-14T06:32:51+5:30
Delhi Raid Update: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील शक्तिशाली स्फोट व व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित लोकांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेन्स शाखेने(सीआयके) गुरुवारी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.

व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
श्रीनगर - दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील शक्तिशाली स्फोट व व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित लोकांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेन्स शाखेने(सीआयके) गुरुवारी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी सीआयकेने आतापर्यंत १३ ठिकाणी छापे टाकल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे. कारवाई दरम्यान १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे व आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.
दिल्लीस्फोटानंतर तपास संस्थांनी आतापर्यंत डॉक्टरांसह ८ जणांना अटक केली असून, २०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातील अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून माहिती मिळाल्यावर तपास संस्थांनी व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्युल भंडाफोड केला.
टायर फुटल्याने दहशत
नैर्ऋत्य दिल्लीच्या महिपालपूर क्षेत्रात गुरुवारी अचानक एका बसचे टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरली. सोमवारी शहरातील लाल किल्ल्यानजीक शक्तिशाली स्फोट झाल्याची घटना ताजी असताना हा प्रकार घडल्यामुळे लोक भयभीत झाले. सकाळी ९ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास महिपालपूरच्या रेडिसननजीक स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.
स्फोटांसाठी आणखी कार खरेदी करणार होते
व्हाइट कॉलर मॉड्यूलच्या कटानुसार सध्या चार कार सापडल्या आहेत. त्या विविध ठिकाणी स्फोटके वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार होत्या. इतर ठिकाणी स्फोटके वाहून नेण्यासाठी अधिक कार खरेदी करण्याचे लक्ष्य होते. स्फोटातील डॉ. उमर व मुजम्मिल याने २०२१पासून तुर्कीच नव्हे तर नेपाळ, यूएई आणि सौदी अरेबियालाही भेटी दिल्या होत्या. ३१ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये शकीलला, ६ नोव्हेंबर रोजी राथेरला अटक व ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान फरिदाबादमध्ये पोलिसांच्या छाप्यामुळे तो घाबरला होता.
ब्रिटनच्या उपपंतप्रधान, मंत्र्यांकडून शोक व्यक्त
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील शक्तिशाली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल ब्रिटनचे उपपंतप्रधान डेव्हिड लॅमी व हिंदी-प्रशांत प्रकरणाचे भारतवंशीय ब्रिटिश मंत्री सीम मल्होत्रा यांनी शोक व्यक्त केला.सोमवारी रात्री दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असे नमूद करत लॅमी यांनी स्फोटातील मृतांबद्दल दु:ख व्यक्त केले. बुधवारी लंडनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
अब्दुल्ला म्हणाले, प्रत्येक काश्मिरी दहशतवादी नाही
जम्मू : दिल्लीतील स्फोटांबाबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती दहशतवादी नसतो.” काही मोजक्या लोकांच्या कृत्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील लोकांना दोषी धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
कोणताही धर्म अशा हिंसेस परवानगी देत नाही. जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक जण दहशतवादी नाही किंवा दहशतवाद्यांशी संबंधित नाही. काही व्यक्तींनी नेहमीच येथील शांतता व सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.