कुजबुज

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:51+5:302015-07-13T01:06:51+5:30

वाघांची इफ्तार पार्टी!

Whisper | कुजबुज

कुजबुज

घांची इफ्तार पार्टी!
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हल्ली सांत आंद्रे मतदारसंघात कार्यक्रमांना वरचेवर दिसू लागलेत. रविवारी बांबोळीतील मुस्लिम बांधवांनी आयोजिलेल्या इफ्तार पार्टीतही त्यांनी भाग घेतला. अर्थात त्यासाठी आमदार विष्णू वाघ यांचे आग्रहाचे निमंत्रण होते हा भाग वेगळा. पार्सेकर आणि वाघ यांचे सूर अनेक बाबतीत जुळलेत. मध्यंतरी वाघांचे नाव मंत्रिपदासाठी होते आणि मुख्यमंत्रीही त्यासाठी अनुकूल होते; परंतु आता त्यांचे नाव मागे पडले. मयेचे आमदार तथा उपसभापती अनंत शेट यांना मंत्रिपद देण्याचे जवळजवळ निश्चित आहे. वाघांनी मात्र आशा सोडलेली नाही. पर्रीकरांशी काही तेवढे जुळले नाही; पार्सेकर यांच्याशी तरी जुळवून घेऊ, असे तर वाघ म्हणत नसावेत ना. सांत आंद्रेत कार्यक्रमांना आणखी ऊत आला तर आश्चर्य वाटू नये.

आयुक्त कंटाळले
महापालिकेत आयुक्त संजित रॉड्रिग्स बरेच कंटाळलेत. कामगारांच्या संपाचा विषय आला की ते जाम भडकतात. कामगारांचे लाड चाललेत, असे त्यांना वाटते. त्यांच्या अवास्तव मागण्या का मान्य कराव्यात, असा त्यांचा नेहमीच प्रश्न. सुरेंद्र फुर्तादो महापौर असताना त्यांनी कामगारांना डोक्यावर बसविले, असे रॉड्रिग्स बोलतात. या प्रश्नावर त्यांचे फुर्तादोंशी बर्‍याचदा वाजलेही आहे. गेल्या पावसाळ्यात भर चतुर्थीत कामगारांनी संप केला तेव्हा आयुक्त दौर्‍यावर होते. तिकडे प्रलयंकारी पूर आणि ते अडकले तेव्हा इकडे फुर्तादो यांनीच मध्यस्थी करून कामगारांचा प्रश्न निकालात काढला. कामगारांच्या मागण्या नेहमीच पूर्ण केल्या जाव्यात हे आयुक्तांना मुळीच पटत नाही. फुर्तादो महापौरपदी नाहीत तरीही नव्या महापौरांकडून तसेच सत्ताधार्‍यांकडून जे काही चालले आहे ते त्यांना मान्य नाही. कंटाळलेल्या आयुक्तांना आपली बदली व्हावी, असे सहकार्‍यांकडे बोलतात.

लोबो आणि थर्ड फ्रंट!
आमदार मायकल लोबो सध्या थर्ड फ्रंट काढण्यासाठी उत्सुक असलेल्यांबरोबर फिरतात. असा बोलबाला आहे की, ते काही लोकांना आगामी विधानसभा निवडणुकीत साळगावमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असे सांगतात तर काहींना कळंगुटमधून भाजपच्याच तिकिटावर पुन्हा रिंगणात उतरेन, असे. प्रत्यक्षात मात्र थर्ड फ्रंटवाल्यांबरोबरच वावरतात. त्यामुळे ते नेमके आहेत तरी कुठे, असा प्रश्न पडतो. लोबो साळगावमधून निवडणूक लढविणार हे कळल्यावर कळंगुटमधील काही पंचसदस्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. हेविवेट उपसरपंच जोसेफ सिक्वेरा तर आधीपासूनच तयारीत आहे. मतदारांना जेवणावळीही सुरू आहेत. येणार्‍या काळात कळंगुटवासियांना काय काय पाहावे लागेल, सांगता येणार नाही.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.