तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:04 IST2025-10-27T13:03:37+5:302025-10-27T13:04:13+5:30
..हा ट्रम्प यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणाने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५०% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले होते. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असून, हा ट्रम्प यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत सुमारे २२ टक्के वाढ झाली आहे.
यासंदर्भात 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत सुमारे २२% एवोढी वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने टेलीफोन सेट, झिंगा, ॲल्युमिनियम आणि शिमला मिरचीसारख्या वस्तूंचा समावेश आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये झालेल्या सुधारणांचा आणि चीनच्या भारताप्रती बदललेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम असल्याचे दिसते.
झिंगा उद्योगाला मोठा दिलासा -
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताच्या झिंगा उद्योगाला मोठा फटका बसला होता. टॅरिफमुळे अमेरिका-भारत हवाई मालवाहतूक निर्यातीत १४% नी घट झाली होती, तर एकट्या आंध्र प्रदेशातील झिंगा उद्योगाला २५,००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एवढेच नाही तर, ५०% पर्यंत ऑर्डर्स रद्दही झाल्या होत्या. मात्र, चिनी बाजारपेठेतील भारतीय मालाला वाढत्या मागणीने या उद्योगाला मोठा आधार मिळाला आहे.
काय म्हणाले चिनी राजदूत -
भारतातील चीनचे राजदूत श फीहोंग यांनी या सकारात्मक व्यापारवृद्धीबद्दल 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमोध्ये त्यांनी लिहिले, "२०२५-२६ या अर्थवर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताकडून चीनला होणारी निर्यात २२% वाढली आहे. चीन भारतीय 'प्रीमियम' वस्तूंना आपल्या बाजारपेठेत अधिकाधिक जागा देईल."
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानंतर, चीनच्या बाजारपेठेत भारताची निर्यात वाढणे, हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा सकारात्मक बदल आहे.