'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:05 IST2025-10-06T18:03:02+5:302025-10-06T18:05:00+5:30
Russian woman in Cave Husband: काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात एका लेणीमध्ये दोन मुलांसह एक रशियन महिला राहत असल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्या महिलेच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण, कोर्टाने त्याला उलट सवाल करत झापले.

'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
Russian Woman Supreme Court: दोन मुलींसह लेणीमध्ये राहणाऱ्या रशियन महिलेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालया प्रचंड संतापले. त्या रशियन महिलेच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालय महिलेच्या पतीला म्हणाले की, तुमची मुलं लेणीमध्ये राहत होती, तेव्हा तुम्ही काय केलं. तुम्ही त्यावेळी काय करत होतात?, असे सवाल करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी त्याला झापले.
नीना कुटिया ही रशियन महिला तिच्या दोन मुलींसह कर्नाटकातील एका लेणीमध्ये राहत होती. ११ जुलै रोजी ती गोकर्णातील रामतीर्थ हिल्स परिसरात आढळून आली होती. दोन महिने ती मुलांसह राहत होती. त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रेही नव्हती. रशियाच्या दूतावासाने आपत्कालीन प्रवासाचे कागदपत्रे दिली.
रशियन महिलेच्या इस्रायली पती, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
दरम्यान, या महिलेचा आणि त्या दोन मुलीचा आपण पती असल्याचा दावा इस्रालयी नागरिकाने केला. द्रोर श्लोमो गोल्डस्टेन असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझ्या मुलींना तातडीने भारतातून परत पाठवून नये, असे निर्देश केंद्र सरकारला द्यावे अशी विनंती त्याने केली होती. उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली.
गोव्यात राहत असलेल्या गोल्डस्टेन याने नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सु्र्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने झापले
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी गोल्डस्टेईनला झापले. तुमचा अधिकार काय आहे? तुम्ही कोण आहात? त्या दोन मुलींचे तुम्ही वडील असल्याचे अधिकृत कागदपत्रे आम्हाला दाखवा. तुम्हाला तुमच्या देशात पाठवावे, असे आदेश आम्ही का देऊ नये? तुमची मुलं जेव्हा लेणीमध्ये राहत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात? तुम्ही गोव्यात काय करत होतात?', अशा शब्दात झापत न्यायालयाने याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. सुनावणीच्या अखेरीस न्यायमूर्ती म्हणाले, हा देश नंदनवन झाला आहे. कुणीही येतंय आणि इथे राहत आहे.'