गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:43 IST2025-12-30T15:42:49+5:302025-12-30T15:43:39+5:30
Raihan Vadra on Gandhi Family: रेहान वाड्रा राजकारणात सक्रीय नसल्याने फारसा चर्चेत नसतो

गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Raihan Vadra on Gandhi Family: काँग्रेस पक्षाच्या महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी व उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा यांचे लग्न ठरले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेहान वाड्राने आपली प्रेयसी अवीवा बेग हिच्याशी साखरपुडा केला. अवीवा बेग ही व्यावसायिक फोटोग्राफर असून, एटेलियर 11 या फोटोग्राफिक स्टुडिओ व प्रॉडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे. गांधी परिवारातील जवळपास सर्वच पिढ्या राजकारणात सक्रीय आहेत. पण रेहान वा़ड्रा यांचे नाव राजकारणात फारसे चर्चेत आलेले नाही. त्यामुळे रेहान वाड्रा आणि इतर गांधी कुटुंब जेव्हा एकत्र भेटते तेव्हा त्यांच्यात काय गप्पा रंगतात, याबाबत रेहान वाड्रा यांनी माहिती दिली होती.
राजकारण हे गांधी कुटुंबात वसलेले आहे, त्यामुळे त्यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण गांधी कुटुंब एकत्र भेटते तेव्हा केवळ राजकारणावरच नव्हे तर फोटोग्राफी, फॅशन, फुटबॉल आणि इतर विषयांवरही चर्चा करतात, असे रेहान वाड्रा यांनी टीव्हीनाईनच्या एका मुलाखतीत तीन वर्षांपूर्वी सांगितले होते. रेहान म्हणाले होते की, ते जे काम करतात त्यात वडील रॉबर्ट वाड्रा आणि आई प्रियंका गांधी नेहमी पाठिंबा देतात, त्यांच्या कामावर प्रेम करतात आणि नेहमीच त्यांना प्रोत्साहन देतात.
राहुल गांधींशी फोटोग्राफीच्या गप्पा
काका राहुल गांधी यांच्याशी रेहान छायाचित्रणाच्या गप्पा मारतात, चर्चा करतात. राहुल यांचा दृष्टिकोन नेहमीच रेहान यांचे काम अधिक कसे सुधारता येईल यावर असतो. राहुल गांधी टीकात्मक परंतु संकल्पनात्मक अभिप्राय देतात, जे रेहान यांच्यासाठी खूप उपयुक्त असतात. ते त्याला त्याचे काम व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला देतात. रेहान स्पष्ट करतात की जेव्हा ते छायाचित्र प्रदर्शनाची संकल्पना आखतात, तेव्हा रचना पूर्ण झाल्यानंतर ते मित्र आणि कुटुंबाकडून सूचना घेतात. राहुल गांधींचे मत सर्वात महत्त्वाचे असते, कारण त्यांच्याकडे एक मजबूत संकल्पनात्मक मत असते.
सार्वजनिक जीवनात असाल तर टीका अपरिहार्य
रेहान म्हणतात की, जर तुम्ही लोकांच्या नजरेत असाल आणि सार्वजनिक जीवनात असाल तर तुमच्यावर टीका होणारच. जसे लोक ट्विटर आणि सोशल मीडियावर व्यक्त होतात तसेच इतर वेळीही होतात. राजकारणात येण्याबाबत सध्या ते भाष्य करू इच्छित नाहीत. त्यांना फोटोग्राफीचे जग जास्त प्रिय आहे.