'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:28 IST2025-05-08T11:25:44+5:302025-05-08T11:28:18+5:30
भारताने ऑपरेशन सिंदूर करून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या लष्करी कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' करून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर आता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना या मोहिमेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' केले. या मोहिमेत, भारतीय सैन्याने, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पोस्ट करून सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची माहिती दिली आहे. आज सकाळी ११ वाजता ही सर्वपक्षीय बैठक संसद पुस्तकालय भवन, संसद परिसर समिती कक्ष जी-०७४मध्ये पार पडणार आहे. या बैठकीत सरकारच्यावतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सामील होतील. राजनाथ सिंह हे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. या बैठकीत सर्व पक्षांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल. तसेच, पुढे भविष्यात आणखी काय पावले उचलली जातील, याच्या रणनीतीवर देखील या बैठकीत चर्चा होईल.
पंतप्रधानांनी बैठकीला उपस्थित राहावे!
ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या बैठकीला उपस्थित असायला हवे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.
"पंतप्रधानांनी बैठकीला उपस्थित राहावे अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान सगळ्या विरोधी पक्षांशी चर्चा करत आहेत, असा संदेश गेला पाहिजे. जेव्हा देश एका आवाजात बोलेले, तेव्हा जगाला ऐकावेच लागेल. पाकिस्तान पूंछमध्ये निष्पाप लोकांवर हल्ला करत आहे. गुरुद्वारावर हल्ला करत आहे. हा दोन्ही देशांमधील फरक आहे. आपण दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करत आहोत आणि पाकिस्तान आपल्या निष्पाप लोकांवर हल्ला करत आहे", असे कॉँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले.