"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:06 IST2025-09-22T09:03:41+5:302025-09-22T09:06:03+5:30
Mohan Bhagwat on H1 B and tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ पाठोपाठ एच१ बी व्हिसाबद्दल नवीन धोरण जाहीर केले. याचा थेट फटका भारतीयांना बसणार आहे. अमेरिकेच्या बदललेल्या भूमिकेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका मांडली.

"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले
Mohan Bhagwat on Trump's Tafiff and H1 B Policy: "आपल्याला भविष्यातील आव्हाने टाळायची असतील, तर स्वतःचा रस्ता तयार करावा लागेल. अमेरिकेने अलिकडेच टॅरिफ आणि इमिग्रेशनशी संबंधित निर्णय घेतल्याने आता भारताने स्वतः मार्ग निवडणे आवश्यक बनले आहे. सनातन दृष्टिकोणावर आधारलेला आणि कुणालाही मागे सोडले जाणार नाही, असा मार्ग निवडण्याची वेळ आली आहे", अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत एका पुस्तकाचे प्रकाशन केले. या सोहळ्यावेळी त्यांनी अमेरिकेने टॅरिफ आणि इमिग्रेशनच्या धोरणावर भाष्य केले.
आरएसएस सरसंघचालक म्हणाले, जे गरजेचं आहे, ते करावंच लागेल
"मागील २००० वर्षांपासून जग दुभंगलेल्या विकासाच्या विचाराने चालत आहे. आज उद्भवत असलेल्या समस्या या त्याचाच परिणाम आहे. परिस्थितीकडे कानाडोळा केला जाऊ शकत नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी जे जे गरजेचं आहे, ते करावंच लागेल. डोळे बंद करून हे करता येणार नाही. आपल्याला आपला मार्ग स्वतःच तयार करावा लागेल", असे भाष्य त्यांनी केले.
"भारताचे चार परंपरागत पुरुषार्थ आहेत. अर्थ, काम, मोक्ष आणि धर्म. याच मूल्यांवर आधारित समाजाचा संतुलित विकास करणे शक्य आहे. भारत एकमेव असा देश आहे, ज्याने पर्यावरणाबद्दल असलेली बांधिलकी पूर्णपणे पार पाडली आहे", असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.
स्वतःच्या दृष्टिकोणाने भारताला वाटचाल करावी लागेल
अमेरिकेतील जुने अनुभव सांगत भागवत म्हणाले, "तिथे भागीदारी करण्याबद्दल तर बोललं जातं, पण प्रत्येक मुद्द्यावर एक शर्थ असते, अमेरिकेच्या हितसंबंधाचे संरक्षण करणाऱ्यांचे संरक्षण. वेगवेगळ्या हितसंबंधामुळे संघर्ष नेहमीच चालत राहील. त्यामुळे भारताला स्वतःच्या दृष्टीने चालावं लागणार आहे", असेही ते म्हणाले.