Hindi Language Row: पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा आणि राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुती सरकारला विरोधामुळे माघार घ्यावी लागली. हिंदीच्या मुद्द्यावरुन प्रचंड विरोध झाल्यानंतर सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. दक्षिणेत सुरु असलेल्या हिंदी विरोधाचे वारे महाराष्ट्रात आल्यानंतर सरकारने नरमाईची भूमिका घेतली. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता
महाराष्ट्रातील भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक महत्त्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संघाचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. अलिकडेच दिल्ली संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची तीन दिवसांची बैठक झाली. त्यानंतरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं. काही राज्यांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरुन विभाजन होत असल्याने त्या संदर्भात बैठकीत काही चर्चा झाली का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनील आंबेकर यांनी भाष्य केलं.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्वीपासून भूमिका आहे की, भारताच्या सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. आपल्या आपल्या राज्यात लोक आपल्या भाषेत बोलतात. प्राथमिक शिक्षण त्याच भाषेत घ्यायला हवं हा सर्वांचा आग्रह आहे. ही गोष्ट संघात आधीपासूनच स्थापित आहे," असं सुनील आंबेकर म्हणाले.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनील आंबेकर यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करत त्रिभाषा धोरणाला आरएसएसचा विरोध असल्याचे म्हटलं. "भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध! मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे! मग महाराष्ट्रात भाषेवरून भांडणे का लावली जात आहेत?," असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, सुनील आंबेकर यांना प्रांत प्रचारकांच्या तीन दिवसांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली का? असंही विचारण्यात आलं. या प्रश्नावर ते म्हणाले की, "देशातील घटना, समाजातील सद्यस्थिती आणि इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. समाजाच्या विविध घटकांमध्ये (ऑपरेशन सिंदूर) याबद्दल उत्साह आहे, जसे की दहशतवादी हल्ल्यांना कसा प्रतिसाद देण्यात आला याबद्दल आम्हाला अभिप्राय मिळाला."