सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:36 IST2025-05-08T13:28:54+5:302025-05-08T13:36:24+5:30
Pakistani Google Trend : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. या कारवाईनंतर आता पाकिस्तानी लोक गुगलवर काय सर्च करताहेत बघाच!

सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर आता भारतीय सेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेची माहिती देशवासियांना दिली. या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या पत्रकार परिषदेनंतर आता पाकिस्तानात या दोन्ही महिला अधिकाऱ्यांविषयी गुगल सर्च केले जात आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पूर्ण आत्मविश्वासाने आणि सन्मानाने या ऑपरेशनची माहिती दिली आणि भारतीय सैन्याने दहशतवादी तळांना कसे लक्ष्य केले ते सांगितले. या पत्रकार परिषदेनंतर देशभरात कर्नल सोफिया यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे, तर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी बरीच चर्चा होत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानमधील लोकांना कर्नल सोफिया कुरेशी, ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
काय सर्च करताहेत पाकिस्तानी नागरिक?
पाकिस्तानी लोक गुगलवर सोफिया कुरेशी यांच्याबद्दल माहिती शोधत आहेत. पाकिस्तानचा गुगल ट्रेंड पाहिल्यास, तिथले लोक 'सोफिया कुरेशी', 'सोफिया कुरेशी धर्म', 'सोफिया कुरेशी इंडियन आर्मी' यासारखे किवर्ड मोठ्या प्रमाणात शोधत आहेत.
याशिवाय भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत?, जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्य असलेल्या भारतीय लष्कराच्या प्रमुखाचे नाव काय आहे?, ऑपरेशन सिंदूरमध्ये काय झाले?, भारत-पाकिस्तान युद्धाची सद्यस्थिती, सिंदूर म्हणजे काय?, राफेलची किंमत काय? याचाही शोध घेतला जात आहे.