"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:14 IST2025-10-11T19:12:07+5:302025-10-11T19:14:09+5:30
Prashant Kishor Bihar Election: निवडणुका जिंकून देण्याची रणनीती आखून देणार प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडे महत्त्वाचा फॅक्टर म्हणून बघितले जात आहे.

"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
बिहार विधानसभा निवडणुकीतून जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर सक्रिय राजकारणाला सुरूवात करत आहे. राजकीय रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्याबद्दल महत्त्वाचे भाकित करतानाच लालू प्रसाद यादव यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राघोपूर विधानसभा मतदारसंघ प्रदीर्घ काळापासून लालू प्रसाद यादवांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच मतदारसंघातून शड्डू ठोकण्याचे संकेत प्रशांत किशोर यांनी दिले.
प्रशांत किशोर म्हणाले, 'मी राघोपूरला जात आहे. तेथील लोकांशी बोलणार आहे. त्यांचा सल्ला घेणार आहे. उद्या (रविवारी) आमच्या पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक होणार असून, त्या बैठकीत राघोपूर आणि इतर मतदारसंघाबद्दलचा निर्णय घेतला जाईल."
तेजस्वी यादवांबद्दल प्रशांत किशोर काय बोलले?
माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादवांना इशारा दिला. अप्रत्यक्षपणे त्यांनी तेजस्वी यादव यांना दोन मतदारसंघातून लढावे लागेल, असेही म्हटले.
किशोर म्हणाले, "राहुल गांधी यांची अमेठीमध्ये जशी अवस्था झाली होती, तशीच अवस्था तेजस्वी यादवांची होईल." २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता.
राघोपूर विधानसभा राजदचा बालेकिल्ला
बिहारच्या राजकारणात राघोपूर विधानसभा मतदारसंघ हॉट सीट म्हणून ओळखला जातो. लालू प्रसाद यादव या मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले होते. त्यांची पत्नी राबडी देवी तीन वेळा या मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या आहेत.
लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी हे मुख्यमंत्री असताना याच मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी निवडणूक लढवली. २०१५ आणि २०२० मध्ये तेजस्वी यादव सलग विजयी झाले. २०२० मध्ये आधी उपमुख्यमंत्री, तर नंतर विरोधी पक्षनेते राहिले आहेत.