राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:44 IST2025-09-04T13:44:04+5:302025-09-04T13:44:30+5:30
Rahul Gandhi News: राहुल गांधी हे आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार असून, त्याला त्यांनी हायड्रोजन बॉम्ब असं नाव दिलं आहे. आता राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब नेमका आहे काय आणि तो कुठे फुटणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती
लोकसभा निवडणुकीत तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतांची चोरी करून सत्ता मिळवल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. तसेच त्यासाठी त्यांनी बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा मतदारसंघाचं उदाहरण दिलं होतं. तसेच या गौप्यस्फोटाचा उल्लेख त्यांनी अणुबॉम्ब असा केला होता. आता राहुल गांधी हे आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार असून, त्याला त्यांनी हायड्रोजन बॉम्ब असं नाव दिलं आहे. आता राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब नेमका आहे काय आणि तो कुठे फुटणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने राबवलेला एसआयआर आणि मतचोरीचा मुद्दा राहुल गांधी यांनी बिहार विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी आक्रमकपणे राबवण्याची योजना आखली आहे. त्यासाठई त्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून १३०० किमीची मतदार अधिकार यात्राही काढली होती. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर राहुल गांधी यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
सध्या राहुल गांधी आणि त्यांची संपूर्ण टीम हा हायड्रोजन बॉम्ब फोडण्यासाठी रणनीती आखत आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांनुसार देशात सुमारे ४८ असे मतदारसंघ आहेत. ज्यावर काँग्रेसची नजर आहे. तसेच या ठिकाणी काँग्रेसला मतचोरी करून पराभूत करण्यात आले असा राहुल गांधी आणि काँग्रेसचा दावा आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी वाराणसीमधील मतचोरीचा उल्लेखही राहुल गांधींच्या अजेंड्यामध्ये असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हाच राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब असणार का? अशी विचारणा होत आहे.
याशिवाय हरयाणा विधानसभेची निवडणूकही काँग्रेसला पचवता आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांची टीम हरयाणाविधानसभा निवडणुकीच्या निकालाचाही अभ्यास करत आहे. तसेच जिथे अगदी किरकोळ फरकाने काँग्रेसचा पराभव झाला आहे. अशा जागांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे आता हरणायामध्ये झालेल्या मतचोरीबाबत राहुल गांधी हरयाणामधूनच करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राहुल गांधी यांनी मतचोरीबाबतचा अणुबॉम्ब हा पत्रकार परिषदेतून फोडला होता. तर आता मतचोरीबाबचचा हायड्रोजन बॉम्ब हा राहुल गांधी जाहीर सभेमधून फोडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.