चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:28 IST2022-06-15T16:27:46+5:302022-06-15T16:28:22+5:30
Agnipath Scheme: चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती.

चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर
केंद्र सरकारने अग्निपथ स्कीमची घोषणा केली आणि सैन्यात नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मनात हजारो शंका आल्या. बिहार, युपीमध्ये तर तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली, गाड्या अडविल्या. हा सारा गोंधळ एकाच प्रश्नावरून होता, चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती.
मोदींच्या अग्निपथ योजनेवरून वातावरण तापले; तरुणांकडून दगडफेक, रेल्वे रोखल्या
यावर आता लगेचच राज्यांनी धडाधड घोषणा, ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सैन्यातून चार वर्षांनी सेवा संपणाऱ्या ७५ टक्के अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दले आणि आसाम रायफल्समध्ये भरतीवेळी प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर राज्यांनी देखील वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकार पोलिस आणि संबंधित सेवांमध्ये भरतीसाठी 'अग्निवीरांना' प्राधान्य देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील यानंतर लगेचच अग्निवीरांना मध्य प्रदेश पोलिसांच्या भरतीमध्ये प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील राज्य पोलिस भरतीमध्ये या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.
दगडफेक, रेलरोको
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्राच्या या योजनेविरोधात वातावरण तापले आहे. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली आहे. तर मुजफ्फरपुरमध्ये देखील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी या उमेदवारांनी चक्काजाम केले आहे.