कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:17 IST2025-10-29T11:17:26+5:302025-10-29T11:17:56+5:30
दोन सख्ख्या भावांचा काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

AI Generated Image
नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा अनुभव सरगुजा जिल्ह्यातील एका कुटुंबाने घेतला आहे. दोन सख्ख्या भावांचा काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मोठ्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू झाला, ही बातमी ऐकून त्याचा मृतदेह घेण्यासाठी निघालेल्या लहानग्या भावालाही रस्त्यात काळाने गाठले. एकाच दिवशी कुटुंबातील दोन कर्तृत्ववान मुले गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रकला धडकून योगेंद्रने गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, सरगुजा जिल्ह्यातील लखनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केवरी गावातील रहिवासी योगेंद्र पैकरा (वय ३३) हा सूरजपूर जिल्ह्याच्या लटोरी गावात किराणा दुकान चालवत होता. सोमवारी रात्री उशिरा तो दुकान बंद करून आपल्या गावाकडे परतत होता. याचदरम्यान अंबिकापूर-वाराणसी स्टेट हायवेवरील चठिरमाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला त्याची भरधाव दुचाकी जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, योगेंद्रने जागीच प्राण सोडले. गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन योगेंद्रचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
बातमी ऐकून निघाला अन्...
पोलिसांनी योगेंद्रच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. ही हृदयद्रावक बातमी ऐकताच, योगेंद्रचा धाकटा भाऊ कुशन सिंह पैकरा (वय २९) तातडीने लखनपूरहून अंबिकापूरकडे, आपल्या मोठ्या भावाचा मृतदेह घेण्यासाठी निघाला. मात्र, दुर्दैवाने वाटेतच नॅशनल हायवे-१३० वर एका अज्ञात कारने कुशनच्या दुचाकीला प्रचंड वेगाने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांच्या मदतीने कुशनला लखनपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला अपोलो हॉस्पिटल, बिलासपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय कुशनला घेऊन बिलासपूरला पोहोचले, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यानेही अखेरचा श्वास घेतला. काही तासांच्या अंतराने त्या आईने आपल्या दोन्ही मुलांना गमावले.
दोन मुलांच्या मृत्यूने कुटुंब पोरके
या दुर्दैवी घटनेने केवरी गावावर शोककळा पसरली आहे. योगेंद्र आणि कुशन यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि अन्य कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी दोन्ही भावांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि त्यांचे पार्थिव गावात आणले गेले. दोन्ही मुलांचे मृतदेह एकाचवेळी गावात पोहोचताच संपूर्ण गावातील लोकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाचे मन हे दृश्य पाहून हेलावले.
पोलिसांकडून अपघातांची कसून चौकशी
सध्या गांधीनगर आणि लखनपूर पोलीस दोन्ही अपघातांची कसून चौकशी करत आहेत. योगेंद्रच्या अपघातात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाची तपासणी सुरू आहे, तर कुशनला धडक देणाऱ्या अज्ञात कारचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. लवकरच गुन्हेगाराला पकडण्यात येईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.